मिरजेत गुटखा पॅॅकिंगचे दीड लाखाचे साहित्य जप्त
By admin | Published: January 5, 2017 11:52 PM2017-01-05T23:52:27+5:302017-01-05T23:52:27+5:30
मिरजेत गुटखा पॅॅकिंगचे दीड लाखाचे साहित्य जप्त
मिरज : मिरज रेल्वे स्थानकात रेल्वे पार्सल कार्यालयातून गुटखा पॅकिंगचे साहित्य रेल्वे पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले. बनावट गुटखा पॅकिंगच्या निर्मितीसाठी वापरण्यात येणारे सुमारे दीड लाखाचे हे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
राणी चेन्नम्मा एक्स्प्रेसमधून आलेली पार्सलची दहा पोती मिरज रेल्वे स्थानकाच्या पार्सल कार्यालयामध्ये ठेवली होती. रेल्वे पोलिस निरीक्षक रमेश भिंगारदेवे, हवालदार राजाराम पाटील यांना याची माहिती मिळाल्याने त्यांनी या पोत्यांची तपासणी केली असता, गुटखा पॅकिंग करण्यासाठी लागणारे छपाई केलेले साहित्य पोत्यांत असल्याचे दिसून आले. ाोलिसांनी ही पोती रेल्वे अन्न व सुरक्षा अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिली.
पोत्यांत सुमारे दीड लाख रुपये किमतीचे ‘गोवा, कोल्हापुरी’सह वेगवेगळ्या नावाने छपाई केलेले गुटखा पॅकिंगचे साहित्य आढळले. संबंधित गुटखा निर्मितीचे साहित्य दिल्ली येथून गोवा-निजामुद्दीन एक्स्प्रेसने आले होते. हुबळी येथे ही पोती उतरवून ती चेन्नम्मा एक्स्प्रेसमधून पुन्हा मिरजेत पाठविण्यात आली. मिरजेतून पार्सल आॅफिसमधून पोलिसांनी ही पोती ताब्यात घेतली. पार्सल कोणाच्या नावावर आले आहे, याची चौकशी सुरू असून संबंधितांवर खटला दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. (वार्ताहर)