महापुरामुळे दीड लाख लोकांचे स्थलांतर, ९५ गावांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:24 AM2021-07-26T04:24:23+5:302021-07-26T04:24:23+5:30
सांगलीत महिलांनी पुराच्या पाण्यातूनच कौटुंबिक साहित्य डोक्यावर घेऊन घरे सोडली. लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यात ९५ गावांना प्रलयंकारी ...
सांगलीत महिलांनी पुराच्या पाण्यातूनच कौटुंबिक साहित्य डोक्यावर घेऊन घरे सोडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यात ९५ गावांना प्रलयंकारी महापुराचा दणका बसला आहे. सुमारे दीड लाख लोक विस्थापित झाले आहेत.
२०१९ च्या अनुभवाने लोक वेळीच घराबाहेर पडल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. महापुरामुळे १०४ गावे बाधित होतात, हे लक्षात घेऊन प्रशासनाने गावे वेळीच रिकामी केली. लोकांनीही पुरापूर्वीच घरे सोडली. सुमारे २५ हजार कुटुंबांतील दीड लाख रहिवाशी पूरपट्ट्यातून सुरक्षितस्थळी गेले. गेल्या महापुरात हजारो जनावरे पुरात वाहून गेली होती, हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी लहान व मोठी अशी ४० हजार जनावरे सोबत नेली.
पुरामध्ये ११ गावे पूर्णत: पाण्याखाली गेली. ८४ गावांना काही प्रमाणात फटका बसला.
चौकट
मीरा हौसिंग सोसायटीची भिंत फोडली
सांगलीत मीरा हौसिंग सोसायटीत पुरामुळे अडकून पडलेल्या रहिवाशांची नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्या पुढाकाराने सुटका झाली. धनेश कातगडे, पांडुरंग व्हनमाने यांच्यासह अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी बोटीतून बाहेर काढले. त्यासाठी सोसायटीची भिंत फोडण्यात आली.
चौकट
सांगली, मिरजेत ६० हजारजण विस्थापित
महापालिकेने १८ शाळांमध्ये पूरग्रस्तांच्या राहण्या-खाण्याची सोय केली आहे. सुमारे दीड हजार लोक आश्रयाला आले आहेत. सांगलीवाडी, कृष्णाघाट, शामरावनगर, गावभाग, कोल्हापूर रस्ता, काकानगर आदी भागांतील सुमारे ४० हजार नागरिकांनी घरे रिकामी केली आहेत. सांगलीवाडी व कृष्णाघाट येथे मोजके तरुण घरांत थांबून आहेत. महिला व इतरांनी नातेवाइकांकडे धाव घेतली आहे. काहीजणांनी हॉटेलमध्ये राहणे पसंत केलेे आहे.
चौकट
जनावरे दुष्काळी भागात
जिल्ह्याच्या पूरग्रस्त पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी जनावरे दुष्काळी भागात पाहुण्यांकडे नेऊन बांधली आहेत. गेल्या महापुरातील जनावरांची हानी लक्षात घेऊन जनावरे सुरक्षित भागात नेली. सांगली, मिरजेत मुख्य रस्त्याकडेलाही अनेक ठिकाणी बांधून ठेवली आहेत.
चौकट
वाळव्याला सर्वाधिक फटका
महापालिका क्षेत्रात सांगलीवाडीला पुराने घेरले. मिरज तालुक्यात दोन गावे पूर्णत:, तर २ गावे अंशत: बाधित झाली. सांगलीच्या पश्चिमेकडील १५ गावे अंशत: बाधित झाली. वाळवा तालुक्यात २९, आष्टा परिसरात ८, शिराळा तालुक्यात १४, पलूस तालुक्यात २३ गावे पुराने वेढली. वाळवा तालुक्याला सर्वाधिक फटका बसला.