३४४२९ बांधकाम कामगारांच्या खात्यात दीड हजार जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:26 AM2021-05-09T04:26:13+5:302021-05-09T04:26:13+5:30
सांगली : लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील ८१ हजार बांधकाम कामगारांचा रोजगार थांबल्यामुळे त्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दीड हजार रुपये जमा करण्याची ...
सांगली : लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील ८१ हजार बांधकाम कामगारांचा रोजगार थांबल्यामुळे त्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दीड हजार रुपये जमा करण्याची घोषणा राज्य शासनाने केली होती. त्यानुसार नोंदणीकृत ३४ हजार ४२९ कामगारांना प्रत्येकी दीड हजाराची मदत मिळाली आहे. जिल्ह्यासाठी पाच कोटी १६ लाख रुपये मिळाले आहेत.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर निर्बंध कडक करण्यात आले होते. बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य शासनाने लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यावेळी हातावर पोट असणाऱ्या अनेक कामगारांनी विरोध केला होता. कामगारांना आर्थिक मदतीची हमी देत शासनाने लॉकडाऊन जाहीर केले. आता जिल्ह्यातील नोंदणीकृत कामगारांच्या खात्यात दीड हजार रुपये मदत जमा झाली आहे, असे कामगारांनी सांगितले. शासनाच्या मदतीचा जिल्ह्यातील ३४ हजार ४२९ कामगारांना फायदा झाला आहे. मात्र, शासनाकडे नोंदणी नसलेल्या बांधकाम कामगारांना शासनाकडून मदत मिळाली नसल्यामुळे ते नाराज आहेत. मदतीपासून वंचित राहिलेल्या कामगारांची संख्या ४६ हजार ५७१ पर्यंत आहे.
कोट
सध्या लॉकडाऊन असल्याने काम बंद आहे. त्यामुळे कसे जगायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाकडे बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली आहे. आवश्यक कागदपत्रे जमा केली होती. त्यानुसार शासनाने दीड हजार रुपये ऑनलाइन बँक खात्यात जमा केले आहेत. या रकमेचा मोठा फायदा झाला आहे.
- संतोष बेलदार, बांधकाम कामगार.
कोट
सध्या काम बंद असल्याने हाल होत आहेत. दोन वेळच्या अन्नासाठी काय करायचे, असा प्रश्न पडतो आहे. या अडचणीच्या काळात शासनातर्फे दीड हजार रुपये मिळाल्यामुळे मोठा आधार झाला आहे. लॉकडाऊन असेपर्यंत शासनाने मदत द्यावी, एवढीच अपेक्षा आहे.
-प्रदीप जाधव, बांधकाम कामगार.
कोट
नोंदणीकृत सर्व बांधकाम कामगारांच्या बँक खात्यावर शासनाची दीड हजार रुपयांची मदत जमा झाली आहे. जे नोंदणीकृत नाहीत, त्यांना शासनाच्या पैशाचा लाभ झाला नाही. सर्वच बांधकाम कामगारांनी नोंदणीही प्राधान्याने केली पाहिजे, तरच ते शासनाच्या सर्व योजनांसाठी पात्र ठरणार आहेत.
-कॉ. शंकर पुजारी, अध्यक्ष, निवारा बांधकाम कामगार संघना, सांगली.
चौकट
नोंदणी केलेले बांधकाम मजूर - ३४४२९
नोंदणी न केलेले बांधकाम मजूर - ४६५७१