दीड लाखाचा कालबाह्य पोषण आहार जप्त; जत, कुपवाडमध्ये छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2015 01:43 AM2015-07-03T01:43:21+5:302015-07-03T01:45:03+5:30
--‘लोकमत’चा दणका
सांगली : जत आणि कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील कालबाह्य पोषण आहार उत्पादन केंद्रांवर गुरुवारी अन्न व औषध प्रशासन विभागाने छापे टाकले. या छाप्यांत जतमधील साहित्य हलविण्यात आल्याचे दिसून आले; मात्र कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील पसायदान महिला विकास संस्थेच्या केंद्रामध्ये एक लाख ४३ हजार रुपयांची सुमारे पाच हजार ६०० किलो गुळाची पावडर मिळून आली आहे. तिचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. त्यात दोष आढळल्यास संबंधित ठेकेदारावर फौजदारी करण्यात येईल, अशी माहिती ‘अन्न-औषध’चे सहायक आयुक्त डी. एच. कोळी यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाड्यांना पोषण आहाराचा पुरवठा करण्यात येतो. जत तालुक्यातील अंगणवाड्यांमध्ये बालक, गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना कालबाह्य पोषण आहाराचे वाटप करण्यात येत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये १ जुलैला प्रसिद्ध झाले होते. याचा पुरवठा कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील पसायदान महिला विकास संस्था केंद्राकडून केला जात असल्याचेही स्पष्ट केले होते. या वृत्ताची अन्न व औषध प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली. तपासासाठी दोन पथके तयार करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी अनिल पवार, राहुल खंडागळे, श्रीमती रूपाली खापणे, तानाजी कांबळे, आदींच्या पथकाने गुरुवारी जतमध्ये छापा टाकला. जतमधील संशयित ठिकाणाहून साठा हलविण्यात आला होता, त्यामुळे तेथे काहीही आढळून आले नाही. त्यानंतर दुपारी कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील महिला बचत गटाच्या पसायदान विकास संस्थेच्या केंद्रावर छापा टाकण्यात आला. तेथे पाच हजार ६०० किलो कालबाह्य झालेली गुळाची पावडर आढळून आली. तेथे अस्वच्छतेचे साम्राज्य आढळून आले. उत्पादक केंद्राने पोषण आहाराच्या पाकिटावर २ जूनची तारीख घातल्याचेही दिसून आले. पॅकिंगवर जुनी तारीख टाकण्याचे कारण त्यांचे प्रतिनिधी सांगू शकले नाहीत. त्याचबरोबर केंद्राकडे उत्पादनाचा परवानाही सापडला नाही. जप्त करण्यात आलेल्या आहारातील नमुने सायंकाळी पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. त्यात दोष आढळल्यास संबंधितांवर फौजदारी दाखल करण्यात येईल, अशी माहिती सहायक आयुक्त कोळी यांनी दिली.