सांगलीतील मंदिरे चोरीचा छडा एकास अटक : ३० हजारांचा ऐवज जप्त,
By Admin | Published: May 10, 2014 11:52 PM2014-05-10T23:52:56+5:302014-05-10T23:52:56+5:30
सांगली : येथील कृष्णा नदीजवळ माई घाटावरील श्री अक्कलकोट स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे दत्त मंदिर व श्री स्वामी समर्थ या दोन मंदिरात झालेल्या
सांगली : येथील कृष्णा नदीजवळ माई घाटावरील श्री अक्कलकोट स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे दत्त मंदिर व श्री स्वामी समर्थ या दोन मंदिरात झालेल्या चोरीचा छडा लावण्यात शहर पोलिसांना शनिवारी यश आले. याप्रकरणी गणेश अंकुश बंडगर (वय १९, सांगलीवाडी, सध्या कलानगर, सांगली) या संशयितास अटक केली आहे. त्याच्या घरातून मंदिरातून चोरीस गेलेल्या सर्व वस्तू जप्त केल्या आहेत. या मंदिरांत गुरुवारी मध्यरात्री चोरी झाली होती. मंदिरात एक मोबाईल सापडला होता. हा मोबाईल चोरट्याचा असावा, असे पोलिसांना संशय होता. मोबाईलवरून तपास सुरू होता. त्यावेळी बंडगरचे नाव निष्पन्न झाले होते. त्याचे आई, वडील कलानगरमध्ये बांधकामावर काम करतात. तिथेच शेड बांधून ते राहतात. त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली. तथापि तो रात्रीपासून गायब असल्याची माहिती मिळाली. शेडची झडती घेतल्यानंतर श्री स्वामी समर्थांची पितळी उत्सव मूर्ती, पांढर्या धातूची श्रीकृष्णाची मूर्ती, दोन पितळी घंटा, शंख स्टँण्ड, पितळी कळस, पिवळ्या मुलाम्याचे कासव, पितळी लहान डबे, ध्वनिक्षेपक, स्टिलच्या २५ भातवाड्या, पितळी समई अशा वस्तू सापडल्या. बंडगरचा शोध सुरू होता, मात्र तो सापडत नव्हता. शनिवारी सकाळी मिरजेत पोलिसांची गस्त सुरू होती. त्यावेळी क्रमांक नसणार्या एम-८० दुचाकीवरून जात असताना तो सापडला. त्याला अटक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)