मिरजेत पिस्तूल, जिवंत काडतुसासह एकास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 03:40 PM2022-03-04T15:40:50+5:302022-03-04T15:42:04+5:30
पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्याच्या कमरेला पिस्तूल व एक जिवंत काडतूस मिळाले
मिरज : मिरजेत शस्त्रविक्रीसाठी आलेल्या एकास गांधी चाैक पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने जेरबंद केले. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतूस हस्तगत केले आहे.
गांधी चाैक पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलिसांना व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कर्मचाऱ्यांना एक जण शस्त्रविक्रीसाठी फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी शोध घेतल्यानंतर हॉटेल रिलॅक्सजवळ पानपट्टीजवळ अंगात जांभळ्या रंगाचा टी-शर्ट व निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट घातलेला सूरज जगन सहानी (वय २४, रा. अभयनगर, सांगली) हा उभा असल्याचे दिसले. पोलिसांनी त्याची चौकशी केल्यानंतर त्याच्या कमरेला पिस्तूल व एक जिवंत काडतूस मिळाले.
या पिस्तुलाबाबत पोलिसांनी त्याच्याकडे शस्त्र परवान्याची व पिस्तूल व काडतूस कोणाचे आहे, अशी विचारणा केली असता त्यास समाधानकारक उत्तर देता आले नाही. सहानी याच्याकडे शस्त्र परवाना नसल्याचे आढळल्याने त्याच्याकडील ४० हजार रुपये किमतीचे पिस्तूल व २०० रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस असा एकूण ४० हजार दोनशे रुपयांचा ऐवज जप्त करून अटक केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस व प्रशांत निशाणदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने ही कारवाई केली.