वाळू तस्करीची माहिती पाेलिसांना देत असल्याच्या संशयावरून एकास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:18 AM2021-02-05T07:18:03+5:302021-02-05T07:18:03+5:30
जत : रेवनाळ (ता. जत) येथे बेकायदेशीर वाळू वाहतूक करत असल्याची माहिती जत पोलीस आणि तहसीलदारांना देत असल्याच्या ...
जत : रेवनाळ (ता. जत) येथे बेकायदेशीर वाळू वाहतूक करत असल्याची माहिती जत पोलीस आणि तहसीलदारांना देत असल्याच्या संशयावरून बाजीराव आबा बंडगर (वय ३६. रा. रेवनाळ) यांना लोखंडी गज, काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. हल्ल्यामध्ये बंडगर गंभीर जखमी झाले. या प्रकरणी रोहन मच्छिंद्र वाघमोडे, संभाजी शिवाजी माने, रामकृष्ण रावसाहेब वाघमोडे, सुनील आटपाडकर (सर्व रा. रेवनाळ) या चार जणांच्या विरोधात शनिवारी रात्री उशिरा बाजीराव बंडगर यांनी फिर्याद दाखल केली आहे. ही घटना २९ जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता घडली.
बाजीराव बंडगर यांची रेवनाळ येथे शेती आहे. ते वाळू तस्करीची माहिती पाेलीस व महसूल पथकास देत असल्याचा संशय राेहन वाघमाेडे, संभाजी माने, रामकृष्ण वाघमाेडे, सुनील आटपाडकर यांना हाेता. २९ जानेवारी रोजी बाजीराव बंडगर हे गावात आले असताना वरील चाैघांनी त्यांना अडवून ‘तू आम्ही करत असलेल्या व्यवसायाची माहिती व टीप देतो आहेस’ असा जाब विचारून त्यांना मारहाण करून गंभीर जखमी केले. याबाबत अद्याप कोणासही अटक करण्यात आली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास जत पोलीस करत आहेत.