काळी खण सुशोभिकरणासाठी एक कोटी
By admin | Published: August 10, 2016 11:39 PM2016-08-10T23:39:33+5:302016-08-11T00:53:38+5:30
पर्यटनस्थळ विकसित करणार : जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी; लवकरच आराखड्यानुसार कामास सुरुवात
सांगली : महापालिकेच्या काळी खण परिसराचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी अडीच कोटीचा आराखडा तयार करण्यात आला असून, त्यातील एक कोटीच्या कामांना लवकरच सुरुवात केली जाणार असल्याची माहिती बुधवारी महापौर हारुण शिकलगार यांनी दिली.
जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी सकाळी महापौरांसह काळ्या खणीची पाहणी केली. जिल्हा नियोजन समितीतून नावीन्यपूर्ण योजनेतून काळी खण सुशोभिकरणासाठी ७० टक्के निधी देण्याची तयारी जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविली. उर्वरित ३० टक्के निधीची तरतूद महापालिकेला करावी लागणार आहे. याबाबत महापौर शिकलगार म्हणाले की, काळी खण सुशोभिकरणाचा २३ कोटींचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला आहे, पण या प्रस्तावात त्रुटी असल्याने अद्याप तो मंजूर झालेला नाही. हा प्रस्ताव कधी मंजूर होईल, याची माहिती नाही. तोपर्यंत काळी खण परिसर विकसित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे.
या परिसराच्या विकासासाठी आर्किटेक्ट प्रमोद चौगुले यांनी अडीच कोटींचा आराखडा तयार केला आहे. त्यापैकी एक कोटीच्या कामांना लवकरच सुरुवात होईल. खणीच्या दक्षिण बाजूकडून कामाला सुरुवात केली जाणार असून, तेथील झाडेझुडपे काढून बाकडी बसविली जाणार आहेत. स्वरुपनगरच्या बाजूला होर्डिंग्ज उभारण्याचा मानस आहे. नावीन्यपूर्ण योजनेतून त्यासाठी निधी प्राप्त होईल. लवकरच प्रशासनासमोर हा प्रस्ताव ठेवून कामाला सुरुवात केली जाणार असल्याचे शिकलगार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
प्रस्तावात या गोष्टी
केंद्र शासनाकडे सादर होणाऱ्या प्रकल्पातील २० टक्के हिस्सा राज्य शासनाच्या पर्यावरण मंत्रालयाकडून प्राप्त होणार आहे, तर केंद्राकडून ७० टक्के निधी मिळणार होता. या प्रकल्पात सिल्ट ट्रॅप, कुंपण, वॉटर एरियेटर्स, पादचारी मार्ग, सायन्स सेंटर, चिल्ड्रन पार्क, मत्स्यालय, बोटिंग क्लब, अम्फी थिएटर आदीचा समावेश होता. कोल्हापूरच्या रंकाळाप्रमाणे योजना राबविण्याचा प्रयत्न सुरू आहे.