‘म्हैसाळ’साठी शिंदे कारखान्याकडून एक कोटी
By Admin | Published: February 14, 2016 12:48 AM2016-02-14T00:48:21+5:302016-02-14T00:48:21+5:30
कारखाना कार्यस्थळावर बैठक : बावीस गावांतील शेतकऱ्यांकडून पैसे कपात होणार
मिरज : म्हैसाळ योजना सुरू होण्यासाठी आरग येथील मोहनराव शिंदे कारखान्यातर्फे एक कोटी रुपये भरण्यात येणार आहेत. कारखान्यात आज झालेल्या बैठकीत म्हैसाळ योजनेसाठी प्रतिटन ५० रुपये कपात करून एक कोटी रुपये जमा करण्याचा निर्णय झाला. अध्यक्ष मनोज शिंदे यांच्यासह २२ गावातील शेतकरी, जिल्हा परिषद, पं. स. सदस्य, पाणी संघर्ष समिती व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते बैठकीस उपस्थित होते.
मिरज पूर्व भागातील पाणी टंचाईची तीव्रता वाढत चालली असून, पाण्याअभावी बागायती पिके धोक्यात आली आहेत. म्हैसाळ योजनेच्या पाण्याच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. या पार्श्वभूमीवर आज मोहनराव शिंदे कारखान्यात बैठक झाली. अध्यक्ष मनोज शिंदे म्हणाले, पाण्याअभावी शेतकरी व उसाचे पीक अडचणीत आहे. मिरज पूर्व भागातील क्षेत्रात ३५ टक्के ऊस व ६५ टक्के बागायती पिके आहेत. ऊस वाळून गेला, तर पुढील हंगामात कारखानासुध्दा अडचणीत येणार आहे. त्यामुळे ऊस बिलात प्रतिटन कपात व उर्वरित कारखान्यातर्फे देऊन एक कोटी रुपये जमा करण्याची त्यांनी घोषणा केली. पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रमोद इनामदार यांनी जत कारखान्यानेही एक कोटी रुपये देण्याची मागणी केली. मोहनराव शिंदे कारखान्याचे ४१५ कर्मचारी म्हैसाळ योजनेसाठी एक दिवसाच्या वेतनाची १ लाख ६० हजार रुपये रक्कम देणार असल्याचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाटील यांनी सांगितले. कारखान्याने आजपर्यंत १ लाख १५ हजार टन उसाचे गाळप केले असून, प्रतिटन ५० रुपयांप्रमाणे शेतकऱ्यांच्या बिलातून कपात करून सुमारे ६० लाख रुपये जमा होणार आहेत. उर्वरित ४० लाख रुपये कारखान्यातर्फे देऊन यापुढे होणाऱ्या गाळपातून वसूल केले जाणार आहेत. ऊस बिलातून कपात करून म्हैसाळ योजनेची थकबाकी भरण्याचा व कपातीबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी झाल्यास गावपातळीवर त्यांना समजावण्याचा बैठकीत निर्णय झाला. दि. १६ रोजी कारखान्याकडून १ कोटी रुपये म्हैसाळच्या अधिकाऱ्यांकडे देण्यात येणार आहेत. बैठकीस तालुका काँग्रसे अध्यक्ष अमरसिंह पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कांबळे, प्रकाश देसाई, पंचायत समिती सदस्य शंकर पाटील, खंडेराव जगताप, तानाजी पाटील, वसंत गायकवाड, अरुण गतारे, लक्ष्मीवाडीचे सरपंच दाजी खोत, शेतकरी संघटनेचे बी. आर. पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)