शेअर मार्केटव्दारे सव्वा कोटींचा गंडा घालून झाला होता पसार, सांगली पोलिसांनी आवळल्या मुसक्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2023 05:44 PM2023-04-07T17:44:47+5:302023-04-07T17:45:13+5:30
शेअर मार्केटच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार वाढले
सांगली : शेअर मार्केटच्या माध्यमातून कमी कालावधीत जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून आटपाडी परिसरातील गुंतवणूकदारांना एक कोटी २७ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या संशयितास पोलिसांनी जेरबंद केले. संतोष धोंडिराम ढेमरे (वय ३९, रा.आटपाडी ) असे संशयिताचे नाव आहे. त्याने इतर सहकाऱ्यांच्या मदतीने व्हीएचएस ट्रेडर्स एलएलपी या कंपनीच्या माध्यमातून अनेकांची आर्थिक फसवणूक केली होती. गंडा घालून पसार झालेल्या ढेमरे याच्या पोलिसांनी अखेर मुसक्या आवळल्या.
या कंपनीच्या माध्यमातून आटपाडी परिसरातील गुंतवणूकदारांची फसवणूक होताच संतोष ढेमरेसह संदीप धोंडिराम ढेमरे, विनोद दादासाहेब कदम, हारुण इस्माईल तांबोळी (रा. सर्व आटपाडी) यांच्यावर आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून मुख्य संतोष ढेमरे हा पसार होता.
दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकास संशयित संतोष हा पुणे येथील बिबवेवाडी येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तिथे जात अटक केली. संशयित संतोष ढेमरे यास न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला १२ एप्रिलपर्यत पोलिस कोठडी सुनावली.
फसवणूक झाल्यास संपर्क करा
व्हीएचएस कंपनीच्या माध्यमातून अजूनही कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार दाखल करावी. शेअर मार्केटच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे जादा परताव्याच्या आमिषाला कोणीही बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.