जिल्ह्यात २४ तासात होतोय एकाचा मृत्यू..!

By admin | Published: February 7, 2016 01:02 AM2016-02-07T01:02:58+5:302016-02-07T01:02:58+5:30

वर्षभरात ७३० अपघात : ३६३ जणांचा मृत्यू; ८४५ लोक झाले जखमी; उपाययोजना ठरल्या अपयशी

One died in 24 hours in the district ..! | जिल्ह्यात २४ तासात होतोय एकाचा मृत्यू..!

जिल्ह्यात २४ तासात होतोय एकाचा मृत्यू..!

Next

सचिन लाड / सांगली
जिल्ह्यात प्रत्येकवर्षी अपघात होऊन त्यामध्ये बळी जाणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. गतवर्षी सुमारे ७३० अपघात झाले. त्यामध्ये ३६३ जणांचा मृत्यू झाला, तर ८४५ जण गंभीर जखमी झाले आहेत. या आकडेवारीवरुन, जिल्ह्यात २४ तासाला दोन अपघात होत असल्याचे व एकाचा बळी जात असल्याचे चित्र आहे. अपघातांना आळा घालण्यासाठी पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभाग विविध उपाययोजना व मोहिमा राबवित असले तरी, त्याचा वाहनधारकांवर कोणताही परिणाम होत नसल्याचे दिसून येते.
प्रत्येकाला पुढे जाण्याची घाई. चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे, वेगावर नियंत्रण न ठेवणे, दारूच्या नशेत वाहन चालविणे, वाहन सुस्थितीत नाही हे माहीत असतानाही ते चालविणे, वाहतूक नियमांचे पालन न करणे, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे, दुचाकीवर तिघे बसून जाणे, ही अपघात होण्याची प्रमुख कारणे आहेत. वाहतूक पोलीस अडवितात म्हणून वाहन चालविण्याचा परवाना (लायसन्स) काढण्यासाठी दिवसेंदिवस उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात गर्दी वाढत आहे. या गर्दीत १६ ते ३० वयोगटातील तरुण-तरुणी आहेत. लायसन्स देण्यासाठी आरटीओ निरीक्षक परीक्षा घेतात, म्हणून तेवढ्यापुरतेच वाहतूक नियम व चिन्हांचा अभ्यास केला जातो. पण प्रत्यक्षात लायसन्स मिळाल्यानंतर वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन होताना दिसत नाही. सांगलीच्या वाहतूक नियंत्रण शाखेने वर्षभरात वाहतूक नियम तोडणाऱ्या हजारो वाहनधारकांवर कारवाई करुन चाळीस लाखाहून अधिक दंड वसूल केला आहे. यावरुन नियम तोडणाऱ्यांची संख्या वाढली असल्याचे दिसून येते.
सांगली-इस्लामपूर, कणेगाव-कासेगाव, सांगली ते तासगाव, विटा, पलूस, कऱ्हाड, अंकली-मिरज व मिरज-पंढरपूर या मार्गावर अपघातांचे प्रमाण जास्त आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात अपघात होऊन त्यामध्ये बळी जाण्याचे प्रमाण मोठे असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते. गतवर्षी शहरात ४२ अपघात होऊन ४५ जणांचा बळी गेला आहे. रस्ता खराब असल्याने अपघात होण्याचे प्रमाण केवळ दोन टक्के आहे. अपघाताला आळा घालण्यासाठी ग्रामीण भागात रस्त्यावरील ढाबे, पानटपऱ्या, चहाची खोकी, झोपड्या ही अतिक्रमणेही काढण्याची गरज आहे. वाहतूक नियमांच्या पालनासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस, आरटीओ वाहतूक सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून संयुक्तपणे मोहीम राबवितात. शाळा, महाविद्यालयांत व्याख्याने दिली जातात. पण प्रत्यक्षात त्याचा काहीच उपयोग होताना दिसत नाही.
 

Web Title: One died in 24 hours in the district ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.