चाबुकस्वारवाडीत वीज पडून एक ठार, दोन जखमी
By घनशाम नवाथे | Published: May 22, 2024 10:48 AM2024-05-22T10:48:35+5:302024-05-22T10:49:22+5:30
सलगरे ते चाबुकस्वारवाडी हद्दीत शिरूर रस्त्या नजीक कारवार यांचे शेत आहे.
घनशाम नवाथे, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली : मिरज तालुक्यातील चाबुकस्वाडी येथे वीज पडुन सुभाष गोविंद नाईक (वय 45, रा.खटाव ता. मिरज) हे जागीच ठार झाले. तर सहादेव महादेव धोतरे (वय 22, रा. बीड), संदिप जगन पवार (वय 22, रा. बीड) हे दोघे गंभीर जखमी झाले. चाबुकस्वारवाडी ते शिरूर या रस्त्यावरील एका शेतात ही वीज पडली. कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात याबाबत नोंद झाली आहे. अधिक माहिती अशी, सलगरे ते चाबुकस्वारवाडी हद्दीत शिरूर रस्त्या नजीक कारवार यांचे शेत आहे.
या शेतामध्ये विहिरीचे खोदकाम सुरू असून काम सुरू असताना मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जोरदार वाऱ्याने वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. पाऊस येत असल्याचे पाहून विहीर खोदकाम करणारे कामगारांनी जवळच असणाऱ्या एका पडक्या इमारती शेजारील शौचालयाचा आडोसा घेतला. सुभाष गोविंद नाईक (वय 45, रा.खटाव ता. मिरज), सहादेव महादेव धोतरे (वय 22, रा. बीड), संदिप जगन पवार (वय 22, रा. बीड) हे तिघेजण थांबलेल्या शौचालयावरतीच वीज कोसळली. यामध्ये खटावचे सुभाष नाईक हे जागीच गतप्राण झाले.
तर सहादेव महादेव धोतरे, संदिप जगन पवार हे दोघेजण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी चाबुकस्वारवाडीचे पोलिस पाटील उद्धव खोत, तलाठी कल्पना आंबेकर, कोतवाल सिध्दु लोहार यांच्यासह कवठेमहांकाळ पोलिसांनी धाव घेतली. दोन जखमींपैकी एक गंभीर अवस्थेत असून त्याला पुढील उपचारासाठी मिरज येथील रुग्णालयात पाठवण्यात आल्याचे कवठेमहांकाळ पोलिसांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी भेट देऊन अधिकाऱ्यांची पाहणी केली. तुटपुंज्या पगारावर काम करणाऱ्या गरीब कामगारावर असा हा निसर्गाने आघात केल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.