मिरजेत यशवंत बँकेकडून शंभर टक्के ठेवी परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:23 AM2021-01-02T04:23:20+5:302021-01-02T04:23:20+5:30
यशवंत सहकारी बँकेच्या एक लाखावरील ठेवीदारांना जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नीळकंठ करे यांनी ठेव रकमेचे धनादेश दिले. २००५ ...
यशवंत सहकारी बँकेच्या एक लाखावरील ठेवीदारांना जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नीळकंठ करे यांनी ठेव रकमेचे धनादेश दिले. २००५ नंतर सांगली जिल्ह्यातील अनेक सहकारी बँका अडचणीत आल्या. लाखो ठेवीदारांच्या ठेवी या बॅंकांत अडकल्या आहेत. मिरजेतील १४ कोटींच्या ठेवी असणारी यशवंत सहकारी बँक आर्थिक अडचणीत आल्याने २००९ मध्ये या बँकेवर अवसायक मंडळ नेमण्यात आले. या अवसायक मंडळाने एक लाखापर्यंतच्या विमा असलेल्या सुमारे १० कोटींच्या ठेवी ठेवीदारांना परत दिल्या आहेत. थकित कर्जवसुली करून विमा कंपनीचे दहा कोटी परत करण्यात आले; मात्र एक लाखावरील ठेवीदारांच्या सुमारे चार कोटींच्या ठेवी अडकून पडल्या होत्या.
अवसायकांनी बॅंकेची इमारत विक्री करून इतर ठेवीदारांच्या ठेवी परत करण्याची कारवाई सुरू केली आहे. शुक्रवारी १५ ठेवीदारांना ठेव रकमेचे धनादेश जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांच्याहस्ते देण्यात आले. अवसायनात निघालेल्या यशवंत बँकेतील शंभर टक्के ठेवी परत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, शंभर टक्के ठेवी परत करणारी यशवंत बँक ही जिल्ह्यातील दुसरी बँक ठरली आहे. ठेवीदारांनी आपल्या ठेव रकमेसाठी बँकेत संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांनी केले आहे. यावेळी अवसायक व सहायक उपनिबंधक सुनील चव्हाण, अवसायक अनिल पैलवान, बँकेचे व्यवस्थापक युनूस शेख यांच्यासह कर्मचारी व ठेवीदार उपस्थित होते.