साखर कारखान्यांकडून शंभर टक्के ऊसदर हवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 12:22 AM2017-10-06T00:22:27+5:302017-10-06T00:22:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : गुजरातमधील गणदेवी साखर कारखान्याप्रमाणे साखरेपासूनचे शंभर टक्के उत्पन्न उसाचा दर म्हणून मिळाले पाहिजे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते संजय कोले यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.
ते म्हणाले की, सांगली जिल्ह्यातील हुतात्मा, क्रांती व अन्य कारखान्यांनी जाहीर केलेले दर आम्हाला मान्य नाहीत. शेतकरी संघटनांच्या नेत्यांकडून डॉ. सी. रंगराजन् समितीच्या ७0-३0 च्या फॉर्म्युल्याच्या अंमलबजावणीची मागणी केली जात आहे. आम्हाला रंगराजन् समितीपेक्षा गणदेवी कारखान्याच्या शंभर टक्के दराचा फॉर्म्युला अधिक न्यायकारक वाटतो. त्यामुळे सर्वच कारखान्यांनी या फॉर्म्युल्याचा स्वीकार केला पाहिजे. गणदेवी कारखान्याचा उतारा सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील कारखान्यांपेक्षा कमी असूनही, गणदेवी कारखान्याकडून सर्वाधिक दर दिला जातो. गाळपाच्या माध्यमातून मिळालेले सर्व उत्पन्न ते ऊस शेतकºयांना दराच्या रुपाने देतात आणि उपपदार्थ निर्मितीमधून कारखान्याचा सर्व खर्च अदा करतात. त्यामुळे ही पद्धत सर्वत्र स्वीकारण्याची गरज आहे. अग्रीम बिलापेक्षा अंतिम बिलाला महत्त्व आहे.
ते म्हणाले की, खासदार राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील यांच्यासारखे नेते पहिल्या बिलाचाच गाजावाजा करतात. अंतिम बिलाचे काय होते, त्याकडे ते लक्ष देत नाहीत. त्यामुळे कारखान्यांशी त्यांचे साटेलोटे आहे. शेट्टी यांनी आजवर जाहीर केलेला दर कारखान्यांनी दिलेला नाही. तरीही ते गप्प बसतात. पहिल्या उचलीच्या आकड्यात शेतकºयांना गुंतवायचे, असे या शेतकरी नेत्यांचे कारखानाधार्जिणे धोरण आहे. जागतिक बाजारातील पेट्रोल, डिझेल दराचा साखर उत्पादनावर परिणाम होतो. सध्या क्रुड आॅईलचे दर कमी असल्यामुळे साखर उत्पादन वाढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.