धरणग्रस्तांचे शंभर टक्के पुनर्वसन होईपर्यंत लढा देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:24 AM2021-02-12T04:24:29+5:302021-02-12T04:24:29+5:30
वाळवा : पुनर्वसन अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे गेली ३७ वर्षे धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी संघर्ष करावा लागत आहे. जोपर्यंत शंभर टक्के पुनर्वसन होत ...
वाळवा : पुनर्वसन अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे गेली ३७ वर्षे धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी संघर्ष करावा लागत आहे. जोपर्यंत शंभर टक्के पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत आमचा लढा चालूच राहील, असे प्रतिपादन हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य धरणग्रस्त परिषदेचे उपाध्यक्ष गौरव नायकवडी यांनी केले.
कोडोली (जि. कोल्हापूर) येथील महाराष्ट्र राज्य धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्त संग्राम संघटनेच्या जाहीर मेळाव्यात ते बोलत होते. संघटनेचे राज्यसरचिटणीस लक्ष्मण पासलकर, भारत पाटील, मुसा मुल्ला, उमेश कानडे, श्रीपती पाटील, राजाराम पाटील, सुरेश जाधव, दीपक सोनवणे प्रमुख उपस्थित होते.
नायकवडी म्हणाले, जवळपास राज्यातील सहा लाख धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्त यांचे प्रश्न सुटलेले नाहीत. हे शंभर टक्के प्रश्न जोपर्यंत सुटत नाहीत, तोपर्यंत हा लढा सुरूच राहील.
लक्ष्मण पासलकर म्हणाले, क्रांतिवीर डाॅ. नागनाथ अण्णांच्या विचाराने हा लढा नेटाने पुढे नेला पाहिजे. डाॅ. जे. टी. पाटील यांनी स्वागत आणि ग्रामपंचायत सदस्य उमेश कानडे यांनी प्रास्ताविक केले. एम. पी. पाटील यांनी आभार मानले. मेळाव्यास सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांसह राज्याच्या विविध भागांतून धरणग्रस्त महिला व पुरुष तसेच युवक उपस्थित होते.
फोटो-११वाळवा१
फोटो ओळ : कोडोली (जि. कोल्हापूर) येथील महाराष्ट्र राज्य धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्त संग्राम संघटनेच्या जाहीर मेळाव्यात महाराष्ट्र राज्य धरणग्रस्त परिषदेचे उपाध्यक्ष गौरव नायकवडी यांनी मार्गदर्शन केले.