दोन कुटुंबांतील हाणामारीत एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 04:49 AM2018-04-07T04:49:29+5:302018-04-07T04:49:29+5:30
ग्रामपंचायत निवडणुकीवेळी झालेल्या वादासह शेतीला पाणी देण्यावरून गुरुवारी रात्री कापूसखेड (ता. वाळवा) येथे दोन कुटुंबांत तुंबळ हाणामारी झाली. कोयता, कु-हाड, तलवार आणि दगडांचा वापर करून झालेल्या धुमश्चक्रीत एकाचा खून झाला.
इस्लामपूर (जि. सांगली) - ग्रामपंचायत निवडणुकीवेळी झालेल्या वादासह शेतीला पाणी देण्यावरून गुरुवारी रात्री कापूसखेड (ता. वाळवा) येथे दोन कुटुंबांत तुंबळ हाणामारी झाली. कोयता, कु-हाड, तलवार आणि दगडांचा वापर करून झालेल्या धुमश्चक्रीत एकाचा खून झाला, तर दोन्ही गटांतील चौघे जखमी झाले.
सागर मरळे (३२) असे खून झालेल्या युवकाचे, तर शिवाजी मरळे (६४), दिलीप मोकाशी, उज्ज्वला मोकाशी आणि अश्विनी मोकाशी अशी जखमींची नावे आहेत. सागरच्या खूनप्रकरणी पोलिसांनी नितीन दिलीप मोकाशी व अतुल दिलीप मोकाशी यांना, तर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मरळे गटाच्या अशोक कोळी, अमोल कोळी अशा चौघांना अटक केली आहे.
याप्रकरणाचा तपास केल्यानंतर पोलीस याचे आरोपपत्र दाखल करतील़ आरोपींनी आरोप मान्य न केल्यास याचा खटला चालेल़
घर पेटवले
सागर याचा खून झाल्यानंतर प्रक्षुब्ध झालेल्या त्याच्या समर्थकांनी शुक्रवारी सायंकाळी दिलीप मोकाशी याचे घर पेटवून दिले. तसेच घरातील साहित्याची नासधूस केली. नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने ही आग विझवली.