Sangli: जतमध्ये भरदिवसा कौटुंबिक वादातून एकाचा खून
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 05:04 PM2024-03-06T17:04:33+5:302024-03-06T17:05:47+5:30
जत : जत येथील विजापूर-सातारा रस्त्यावरील सोलनकर चौकात भरदुपारी एक वाजता अविनाश बाळू कांबळे (वय ३०, रा. जत) याचा ...
जत : जत येथील विजापूर-सातारा रस्त्यावरील सोलनकर चौकात भरदुपारी एक वाजता अविनाश बाळू कांबळे (वय ३०, रा. जत) याचा धारदार कोयत्याने हल्ला करून खून करण्यात आला. याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात चार संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, हा खून कौटुंबिक वादातून झाला असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी संशयित आरोपी किशोर नारायण बामणे (वय २५, रा. जत) याच्यासह साथीदार सोनू ऊर्फ महांतेश मुकेश सनके, विजय महेंद्र कांबळे, आनंद ईश्वर कांबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हल्ला करून खून केल्यानंतर संशयित किशोर बामणे हा पसार झाला, तर जत पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित किशोर बामणे याच्या बहिणीचा विवाह जत येथेच विठ्ठलनगरातील मृत अविनाश याच्या भावाबरोबर झाला होता. मृत अविनाश याच्या भावाने पाच वर्षांपूर्वी गळफास लावून घेऊन आत्महत्या केली होती, तसेच आई-वडीलही याअगोदरच मृत झाले आहेत. मृत अविनाश हा दारू पिऊन किशोर याच्या विधवा बहिणीस जागेच्या वादातून त्रास देत होता. हा प्रकार समजताच किशोर याने अविनाश यास ताकीद दिली होती. मात्र, तरीही तो बहिणीला त्रास देत असल्याने कायमचे संपवायचे म्हणून सोलनकर चौकात भरदिवसा गजबजलेल्या ठिकाणी कोयत्याने हल्ला करून खून केला.
नगरसेवक विजय ताड यांचाही खून दिवसा ढवळ्या गोळीबार करून तोंडावर दगड फेकून खून करण्यात आला होता. दिवसाढवळ्यात झालेल्या खुनाच्या घटनेमुळे जत शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खुनाच्या घटनेची माहिती संपूर्ण तालुकाभर वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे घटनास्थळी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. घटनास्थळी तातडीने पोलिस फौजफाटा दाखल झाला. उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे यांनी भेट दिली.
खुनाचे कारण स्पष्ट झाले झाले असून, कौटुंबिक वादातूनच घटना घडली आहे. याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात मृत अविनाश याची बहीण नीलम दशरथ पवार (रा. म्हैसाळ) हिने फिर्याद दिली आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक विक्रांत बोदे करीत आहेत.