यात्रेचे जेवण करून जाताना दुचाकी घसरून एक ठार, आष्टा-नागाव रस्त्यावर अपघात
By श्रीनिवास नागे | Published: April 15, 2023 05:12 PM2023-04-15T17:12:14+5:302023-04-15T17:13:03+5:30
आष्टा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.
सांगली : आष्टा येथे आष्टा-नागाव रस्त्यावर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात प्रकाश विठ्ठल गायकवाड (वय ५२, रा. जुने पारगाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) ठार, तर संग्राम तानाजी सूर्यवंशी (२७, रा. जुने पारगाव) जखमी झाले. ही घटना शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. आष्टा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.
जुने पारगाव येथील संग्राम सूर्यवंशी व प्रकाश गायकवाड शुक्रवारी मर्दवाडी (ता. वाळवा) येथे हनुमान यात्रेनिमित्त सूर्यवंशी यांच्या नातेवाइकांकडे जेवणासाठी आले होते. जेवण केल्यानंतर रात्री दहाच्या सुमारास ते दुचाकीवरून (एमएच ०९ बीएच ८३२४) जुने पारगावकडे निघाले होते. रात्री जोरदार वारे व विजांचा कडकडाट सुरू असल्याने ते काही काळ आष्टा येथे थांबले. यानंतर त्यांनी मुख्य रस्त्याऐवजी आष्टा-नागाव मार्गे जुने पारगावकडे जाण्याचा निर्णय घेतला. वाटेत नागावनजीक वळणावर समोरून येणाऱ्या दुचाकींच्या दिव्यांचा प्रकाश व वादळी वाऱ्यामुळे गायकवाड यांचा दुचाकीवरील ताबा सुटला. यामुळे दुचाकी घसरली. यात प्रकाश गायकवाड रस्त्यावर उजव्या बाजूला पडले. त्यांच्या डोक्याला जोरदार मार लागल्याने ते जागीच ठार झाले. संग्राम सूर्यवंशी किरकोळ जखमी झाला.
पोलिस निरीक्षक अजित सिद्, सहायक पोलिस निरीक्षक आप्पासाहेब बाबर, उपनिरीक्षक राजेंद्र पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कार्यवाही केली. प्रकाश गायकवाड यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. आष्टा येथील शिवाजीराव पाटील पतसंस्थेचे संचालक दीपक शिंदे यांचे ते मेहुणे होत.
हेल्मेट असते तर...
प्रकाश गायकवाड यांनी हेल्मेट घातले असते तर त्यांचा जीव वाचला असता. त्यांच्या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर दीपक शिंदे यांच्यासह नातेवाईक व मित्रपरिवार घटनास्थळी दाखल झाला.