कोंतेयबोबलादला ट्रक-दुचाकी अपघातात एक ठार, मृत कर्नाटकातील विजयपुरजवळील
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 10:26 AM2024-08-07T10:26:16+5:302024-08-07T10:26:48+5:30
ट्रकला मागून दुचाकीस्वार खंडूने मागून धडक दिली. डोक्यास गंभीर जखम झाल्याने तो जागीच मयत झाला.
विठ्ठल ऐनापुरे/ लोकमत न्यूज नेटवर्क
जत : विजयपुर - नगर मार्गावर ट्रकला मागून दुचाकीस्वाराने धडक दिल्याने खंडू कामा वाघमोडे (वय २८, रा. सिद्धापूर ता. व जि. विजयपूर) हा जागीच ठार झाला. जत तालुक्यातील कोंतेवबोबलाद येथे मंगळवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
अधिक माहिती अशी, सिध्दापुर येथील खंडू कामा वाघमोडे हा कामानिमित्त महाराष्ट्र सीमेवरील कोंतेवबोबलाद गावाकडे आला होता. काम संपवून गावी परतत असताना कोंतेवबोबलाद ते विजयपूर या रस्त्यावर जाणाऱ्या ट्रकला मागून दुचाकीस्वार खंडूने मागून धडक दिली. डोक्यास गंभीर जखम झाल्याने तो जागीच मयत झाला.
ही घटना रात्री बाराच्या सुमारास घडल्यानंतर सिद्धापूर गावच्या लोकांनी मृतदेह पाहून ओळख पटवून नातेवाईकांना भ्रमणध्वनीद्वारे कळविले. त्यानंतर पहाटे मृतदेह जत येथील ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. बुधवारी सकाळी दहा वाजता उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. खंडू वाघमोडे हा मजुरी करीत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, लहान चार महिन्याचा मुलगा असा परिवार आहे. उमदी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.