विद्यापीठाकडून विद्यार्थ्याची एक लाखाची फी परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:24 AM2021-03-22T04:24:40+5:302021-03-22T04:24:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : पाडळी (ता. शिराळा) येथील सुशांत विलास पाटील या विद्यार्थ्याने गुजरातमधील एका खासगी विद्यापीठामध्ये ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : पाडळी (ता. शिराळा) येथील सुशांत विलास पाटील या विद्यार्थ्याने गुजरातमधील एका खासगी विद्यापीठामध्ये एक वर्षापूर्वी एक लाख रुपये फी भरून प्रवेश घेतला होता. मात्र, लॉकडाऊनमुळे त्याला शिक्षण घेता आले नाही. संस्थेने फी देण्यास टाळाटाळ केली. मात्र, ॲड. अक्षय कदम यांनी त्याला न्याय मिळवून देत सर्व फी परत देण्यास भाग पाडले.
याबाबत माहिती अशी की, सुशांत पाटील याने प्रवेश निश्चित करण्यासाठी एका खासगी विद्यापीठाकडे एक लाख रुपये फी जमा केली. मात्र, दरम्यानच्या काळात लॉकडाऊन झाल्यामुळे वडिलांची नोकरी गेली. आधीच घराची परिस्थिती बेताची असल्याने पुढचे आर्थिक नियोजन कोलमडून पडले. या कारणाने त्याने विद्यापीठाकडे भरलेली फी परत मागितली. मात्र, विद्यापीठाने याकडे साफ दुर्लक्ष केले.
यानंतर विद्यार्थ्याने ॲड.अक्षय महादेव कदम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तत्काळ मदतीचा हात दिला. सदर विद्यापीठाची रितसर तक्रार युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन (युजीसी)कडे दाखल केली. युजीसीने ऑनलाईन सुनावणी घेतली. अखेर सुशांतला एक वर्षानंतर न्याय मिळाला असून त्याची संपूर्ण फी विद्यापीठास परत करावी लागली आहे.