सांगली : वायफळेत युवक राष्वादीच्या तालुकाध्यक्षाकडून एकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 12:26 PM2018-09-06T12:26:00+5:302018-09-06T12:36:50+5:30
तासगाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून वायफळे (ता. तासगाव) येथील राजेश परशुराम फाळके(वय ५४) यांचा राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्ष राजेश भिमराव पाटील (२६) याने खून केला.
तासगाव : ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून वायफळे (ता. तासगाव) येथील राजेश परशुराम फाळके(वय ५४) यांचा राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्ष राजेश भिमराव पाटील (२६) याने खून केला. मंगळवारी रात्री फाळके यांच्यावर हल्ला झाला होता. या घटनेनंतर संशयित राजेश पाटील हा पसार झाला आहे. त्याला अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा नातेवाईकांनी दिला आहे. दरम्यान गुरुवारी वायफळे गाव बंद ठेवण्यात आले आहे.
राजेश भिमराव पाटील
मंगळवारी रात्री साडे आठ वाजता राजेश फाळके हे वायफळेतील आदित्य ढाब्यावर जेवण करण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्ष व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राजेश पाटील हा एकासोबत मोटारीने (क्र. एमएच. १० सीडी 0७०७) तिथे आला. २०१७ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत तुमचा समाज आमच्या पाठीशी नसल्याचे नव्हता , असे सांगत फाळके यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यात फाळके यांच्या पोटाला गंभीर दुखापात झाली. ते रस्त्यावर पडताच राजेश पाटील याने पलायन केले.
नातेवाईकांनी फाळके यांना उपचारार्थ सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. पण उपचार सुरु असताना बुधवारी पहाटे फाळके यांचा मृत्यू झाला. राजेश पाटील याच्याविरुद्ध खून व अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
फाळके यांचा खून राजेश पाटील यास अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा नातेवाईकांनी दिल्याने रुग्णालयात तणावपूर्ण परिस्थिती आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आगळगावलामृत राजेश फाळके हे आगळगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सहाय्यक म्हणुन नोकरीस होते. त्यांच्या खूनाच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून निषेध व्यक्त केला.