Sangli: बँकेत चोरीचा प्रयत्न करणारा २४ तासांत जेरबंद, आणखी दोघांची नावे निष्पन्न
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 03:08 PM2024-11-29T15:08:07+5:302024-11-29T15:08:39+5:30
तासगाव अर्बनमध्ये चोरीचा प्रयत्न
सांगली : बाजार समिती आवारात तासगाव अर्बन बॅंकेत चोरीचा प्रयत्न करणाऱ्यांपैकी एका चोरट्याला २४ तासांत जेरबंद करण्यात यश आले. ओंकार विशाल साळुंखे (वय १९, रा. राजीव गांधी झोपडपट्टी, जुना बुधगाव रस्ता, सांगली) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने शिताफीने अटक केली.
साळुंखे याच्याकडून सुदर्शन यादव (मूळ रा. कराड, सध्या रा. विश्रामबाग, सांगली) आणि मुनीब ऊर्फ बाबू भाटकर (रा. आंबा चौक, कुपवाड रस्ता, सांगली) या आणखी दोघा संशयितांची नावे निष्पन्न झाली आहेत. या तिघांनी बुधवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास बॅंकेत शिरून चोरीचा प्रयत्न केला होता; मात्र चोरीचा संदेश शाखा व्यवस्थापकांच्या मोबाईलवर गेल्यानंतर पोलिसांनी धाव घेतली. त्याचवेळी बँकेत सायरनही वाजू लागल्याने चोरटे पळून गेले.
ते तिघेही मीरा हौसिंग सोसायटी परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यांचा शोध घेत असताना निकुंज लॉनसमोरील रस्त्यावरून ओंकार साळुंखे चालत जाताना दिसला. पोलिसांनी त्याला तातडीने ताब्यात घेतले. त्याच्या झडतीमध्ये कोयता, कटावणी, चाकू, स्क्रू ड्रायव्हर अशी हत्यारे सापडली. पोलिसांनी त्याला अटक केली असून, अन्य संशयितांचा शोध सुरू आहे. त्यांच्याविरोधात बॅंकेचे व्यवस्थापक अश्विनीकुमार वसंत बिरनाळे यांनी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली.
तिघेही संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हा तपास निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, उपनिरीक्षक कुमार पाटील, अनिल कोळेकर, विक्रम खोत, संदीप गुरव, नागेश खरात, दऱ्याप्पा बंडगर, अनिल कोळेकर, सतीश माने, सागर लवटे, सागर टिंगरे, अमर नरळे, सुशील मस्के, संदीप नलावडे, सूरज थोरात, सुमित सूर्यवशी, कॅप्टन गुंडवाडे, आदींनी केला.
आणखी एक घर फोडले
दरम्यान, अर्बन बँकेत सायरन वाजल्याने तेथून पळ काढलेल्या तिघांनी दुसऱ्या ठिकाणी चोरी केली. मल्टिप्लेक्स चित्रपटगृहाच्या पीछाडीस कॉलनीत घर फोडून चांदीचे साहित्य लंपास केले. तशी कबुली त्यांनी दिली आहे.