चिंताजनक! सांगली जिल्ह्यात १९ तासानंतर जातोय एकाचा अपघाती बळी
By घनशाम नवाथे | Updated: January 14, 2025 18:24 IST2025-01-14T18:24:21+5:302025-01-14T18:24:46+5:30
अपघाताचे प्रमाण वाढल्याने चिंता व्यक्त

चिंताजनक! सांगली जिल्ह्यात १९ तासानंतर जातोय एकाचा अपघाती बळी
घनश्याम नवाथे
सांगली : जिल्ह्यात अपघात स्थळे नाहीशी केली जात असून रस्तेही मोठे झालेत. परंतु अपघातांची मालिका काही थांबतच नसल्याचे दिसून येते. गतवर्षात ९४२ गंभीर अपघात होऊन त्यामध्ये ४४९ जणांचा अपघाती मृत्यू झाला. जिल्ह्यात दर १९ तासाला एकाचा अपघाती बळी जात असल्याचे भयानक चित्र दिसून येते.
जिल्ह्यात दहा वर्षांपूर्वी जवळपास ६० ते ७० ‘ब्लॅक स्पॉट’ अर्थात वारंवार अपघात होणारी ठिकाणे होती. वर्षानुवर्षे याठिकाणी धोका असल्याचे फलक दिसत होते. अखेर अपघाताची ठिकाणेच नामशेष करण्याचे आदेश आल्यानंतर ‘ब्लॅक स्पॉट’ हटवले जात आहेत. आता केवळ मोजकेच ‘ब्लॅक स्पॉट’ आहेत.
दुसरीकडे रस्तेही मोठे झालेत. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे, वेडीवाकडी वळणे, गतिरोधक, धोकादायक चढ-उतार आदीमुळे होणारे अपघात कमी झाले आहेत. बेदरकारपणा, वेगाची नशा, वाहतूक नियमांचे पालन न करणे आदीमुळे अपघात होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे मानवी चुकांमुळे होणारे अपघात टाळण्याचे आव्हान उभे राहिले आहे. रस्ता सुरक्षा अभियानाच्या प्रारंभी अधिकाऱ्यांनी अपघाताचे प्रमाण वाढल्याबद्दल चिंता व्यक्त केली.
अपघाताचे प्रमाण वाढले
गतवर्षात ७२७ गंभीर अपघात होऊन ३४४ जणांचा बळी गेला होता. यंदाच्या वर्षात ९४२ अपघात होऊन ४४९ जणांचा अपघाती बळी गेला आहे. गतवर्षाच्या तुलनेत वाहनांची संख्या वाढली असून अपघातही वाढत आहेत.
दररोज १५० ते १७५ नवीन वाहने
वाहन संख्येचा वेग वाढतच चालला आहे. जिल्ह्यात दररोज १५० ते १७५ नवीन वाहने रस्त्यावर धावताना दिसतात. गतवर्षात नवीन ६७ हजार वाहनांची भर पडली. जिल्ह्यातील एकूण वाहन संख्या डिसेंबर २०२४ अखेर १३ लाख ८३ हजार ४७५ इतकी आहे.
अपघाताची कारणे
सर्वाधिक अपघात हे अतिवेगामुळे होत असल्याचे निदर्शनास आले आहे. निष्काळजीपणे, नागमोडी वळण घेणे. चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे. नशेत वाहन चालवणे. स्वत:च्या कौशल्यावर फाजील आत्मविश्वास असणे. विना हेल्मेट दुचाकी चालवणे. मोटार चालवताना सीटबेल्ट न वापरणे ही अपघाताची प्रमुख कारणे आहेत.
कायद्याने ठरवलेली कमाल वेगमर्यादा
वाहनप्रकार - एक्स्प्रेस हायवे - चौपदरी महामार्ग - महापालिका क्षेत्र इतर रस्ते
आसन क्षमता ८ - १२० - १०० - ७० - ७०
आसन क्षमता ९ पेक्षा जास्त - १०० - ९० - ६० - ६०
सर्व मालवाहू वाहने - ८० - ८० - ६० - ६०
दुचाकी - (परवानगी नाही) - ८० - ६० - ६०
तीनचाकी वाहने - ५० - ५० - ५०
अपघात कसे टाळाल
- दुचाकी चालवताना पुढील वाहनापासून दोन सेकंदाचे अंतर ठेवा. रात्री व पावसाळ्यात ३-४ सेकंदाचे अंतर ठेवा
- वाहनाचा वेग वारंवार तपासा. वेग जास्त असेल तर वाहन थांबण्यास वेळ लागतो.
- ओव्हरटेक उजव्या बाजूनेच करा.
- वाहन नेहमी सुस्थितीतच ठेवा.
- वाहतूक नियमांचे पालन करा.
सुरक्षा अभियान सतत हवे
आरटीओ कार्यालय, पोलिस प्रशासन आणि बांधकाम विभागातर्फे जानेवारी महिन्यात रस्ता सुरक्षा अभियान राबवले जाते. पूर्वी सप्ताह होता. त्यानंतर पंधरवडा झाला. यंदा महिनाभर सुरक्षा अभियान राबवले जात आहे. परंतु अपघातांची वाढती संख्या पाहता अभियान सतत सुरू ठेवण्याची गरज भासत आहे.