कारवाई न करण्यासाठी मागितली एक हजारची लाच, मिरजेत सहायक फौजदार जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 03:31 PM2022-06-16T15:31:31+5:302022-06-16T15:34:50+5:30
कारवाई न करण्यासाठी एक हजार रुपयांची मागणी केली होती
सांगली : रिक्षावर कारवाई न करण्याच्या मोबदल्यास एक हजार रुपयांची लाच घेताना सहायक पोलीस फौजदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. रविशंकर रामचंद्र चव्हाण (वय ५३, रा. इंदिरा अपार्टमेंट, रिसाला रोड, सांगली) असे त्याचे नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
तक्रारदाराची रिक्षा असून असून त्यावर कारवाई न करण्यासाठी चव्हाण याने एक हजार रुपयांची मागणी केली होती. यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दिली होती. या तक्रारीची पडताळणी केली असता त्यात चव्हाण याने एक हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार मिरज येथील महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे परिसरात सापळा लावून लाच स्वीकारताना चव्हाण यास रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याविरोधात महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात लाचलुचपत अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुजय घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तात्रय पुजारी, विनायक भिलारे, अविनाश सागर, अजित पाटील, संजय कलकुटगी, रविंद्र धुमाळ आदींच्या पथकाने ही कारवाई केली.