बालवाडीच्या सांगलीत एक हजार जागा रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 11:23 PM2018-06-13T23:23:58+5:302018-06-13T23:23:58+5:30
महापालिका शिक्षण मंडळाच्यावतीने बुधवारी बालवाडीसाठी सोडत पद्धतीने प्रवेश निश्चित केले. प्रवेश क्षमतेपेक्षा अर्जच कमी आल्याने २६ पैकी पाच शाळांतच सोडत काढण्यात आली
सांगली : महापालिका शिक्षण मंडळाच्यावतीने बुधवारी बालवाडीसाठी सोडत पद्धतीने प्रवेश निश्चित केले. प्रवेश क्षमतेपेक्षा अर्जच कमी आल्याने २६ पैकी पाच शाळांतच सोडत काढण्यात आली. ५१ शाळांमध्ये २४७० प्रवेश क्षमता असतानाही केवळ १५३५ प्रवेश अर्ज आले होते. त्यामुळे या शाळांमधील एक हजार जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. इंग्रजी शाळांकडे पालकांचा ओढा वाढल्याने मराठी शाळांमध्येही गळती वाढल्याचे दिसून येते.
बालवाडी प्रवेशाची सोडत प्रक्रिया शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी हणमंत बिराजदार, लेखाधिकारी भुई यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शाळांमध्ये पार पडली. दरवेळी बालवाडी सोडत करताना शिक्षण संस्थांची तारांबळ उडते. प्रवेश क्षमतेपेक्षा जादा अर्ज येत असतात. त्यातून सोडत पध्दतीकडे पालकांचे लक्ष लागलेले असते.
पण यंदा मात्र उलट परिस्थिती समोर आली आहे. बालवाडी प्रवेश प्रक्रियेवेळी २६ शाळांपैकी केवळ ५ शाळांमध्येच सोडत झाली. अनेक शाळांमध्ये क्षमता जास्त आणि अर्ज कमी, अशी अवस्था झाली आहे. सांगली शिक्षण संस्थेच्या आठवले विनय मंदिरात २०० जागांसाठी ३५० अर्ज, तर बापट बाल शिक्षण मंदिरात २५० जागांसाठी ४४४ अर्ज आले होते. त्यामुळे या ठिकाणीही सोडत काढावी लागली. इमॅन्युअल इंग्लिश स्कूलमध्ये १०० जागांसाठी १२२ अर्ज आले होते. मिरजेतील नूतन बाल विद्यालयात ५० क्षमता असताना १७३ अर्ज, तर एमईएस इंग्लिश स्कूलमध्ये ५० जागांसाठी १०७ अर्ज आले होते. केवळ या शाळांमध्येच सोडत निघाली. इतर शाळांमध्ये क्षमतेपेक्षा कमी अर्ज आल्याने सोडत होऊच शकली नाही.
शाळांसमोर चिंता...
काही वर्षांपूर्वी मराठी शाळांमध्ये अर्ज खरेदीसाठी पहिल्या दिवसांपासून रांगा लागत होत्या. आता मराठी शाळांमधील रांगा कमी होत आहेत. दोन शाळांचा अपवाद वगळता अन्य मराठी शाळांची चिंता वाढली आहे.
प्रवेश क्षमता व अर्ज...
शाळा प्रवेश क्षमता दाखल अर्ज
वसंत प्राथमिक शाळा १५० १३०
सारडा कन्या शाळा १०० ३४
बर्वे प्राथमिक १०० ७७
अभिनव बालक मंदिर १०० ५८
डॉ. देशपांडे प्राथमिक १०० ५७
कांतिलाल शहा (इंग्रजी) ५० १८
कांतिलाल शहा (मराठी) ५० ७४
नूतन मराठी विद्यामंदिर १०० १५