‘एक गाव, एक गणपती’ला ना शाबासकीची थाप, ना प्रोत्साहन!; प्रशासनाकडून एकमेकांकडे बोट

By शरद जाधव | Published: September 21, 2023 04:37 PM2023-09-21T16:37:47+5:302023-09-21T16:38:14+5:30

आर.आर.आबांची आठवण

'One village, one Ganesha' is neither applauded nor encouraged!; Point to each other from administration | ‘एक गाव, एक गणपती’ला ना शाबासकीची थाप, ना प्रोत्साहन!; प्रशासनाकडून एकमेकांकडे बोट

‘एक गाव, एक गणपती’ला ना शाबासकीची थाप, ना प्रोत्साहन!; प्रशासनाकडून एकमेकांकडे बोट

googlenewsNext

शरद जाधव

सांगली : गावातील एकोपा कायम राहावा आणि कमी खर्चात गणेशोत्सव साजरा करण्यात यावा, यासाठी प्रशासनाकडून ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रम सुरू करण्यात आला. शासनाकडून सुरू असलेल्या विविध योजनांवेळी या उपक्रमालाही भरभरून प्रतिसाद मिळाला. मात्र, यंदा उपक्रमात जादा गावे सहभागी व्हावीत यासाठी प्रयत्न न झाल्याने गावागावांत मंडळांचीही संख्या वाढतच गेली आहे.

शासनाकडून ग्रामस्वच्छता अभियान सुरू करण्यात आल्यानंतर गावातील एकी खऱ्या अर्थाने मजबूत झाली. यानंतर राबविलेल्या तंटामुक्त योजनेमुळे ही एकी अधिक दृढ होत तंटे गावातच सुटत होते. यावेळीच शासनाकडून ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. सुरुवातीला यात सहभागी होणाऱ्या गावांची संख्या ३५० वर होती. मात्र, त्यानंतर संख्या घटतच गेली आहे. यंदा तर कसेबसे १२० गावांत हा उपक्रम राबविला गेला आहे.

प्रशासनाकडून प्रयत्नाला ‘खो’

यापूर्वी पोलिस दलाच्या वतीने तालुकास्तरावर बैठका घेत यासाठी आवाहन केले जात असे. आताही पोलिसांकडून तालुका आणि पोलिस स्टेशननिहाय बैठका घेण्यात आल्या. यात ‘एक गाव, एक गणपती’बाबत तितके प्रभावी प्रबोधन करण्यात आले नाही. पोलिसांकडून यंदा डीजेचा वापर नियंत्रणात ठेवण्यावरच अधिक भर दिसून आला.

आर.आर.आबांची आठवण

दिवंगत आर.आर.पाटील गृहमंत्री असताना जिल्ह्यात ‘एक गाव, एक गणपती’ योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला होता. संपूर्ण राज्यात याची दखल घेतली होती. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या कामाचेही कौतुक झाले होते. जिल्ह्यात चांगल्या उपक्रमाला घटत चाललेला प्रतिसाद पाहता आबांची आठवण सर्वांनाच आली.

मंडळांना हवे प्रोत्साहन

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये नेहमीच ईर्षा आणि उत्साह दिसून येत असतो. त्यामुळेच गावागावांत सगळ्यात प्रभावी गणपती आणि सोहळा आपला व्हावा, यासाठी प्रयत्न केले जातात. या मंडळांचे योग्य प्रबोधन केल्यास अनुकरणीय उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळू शकतो. मात्र, मंडळापर्यंत पोहोचण्यातच प्रशासन कमी पडले आहे.

बैठकांचा फार्स आणि केवळ चर्चाच

वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यात प्रत्येक पोलिस ठाण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बैठका घेण्यात आल्या. यात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शनही केले. मात्र, कोणीही ‘एक गाव, एक गणपती’मध्ये सक्रिय पाठपुरावा केलाच नाही. कायदा व सुव्यवस्था राखा, डीजेचा वापर करू नका, यावरच सर्वांचा भर होता.

Web Title: 'One village, one Ganesha' is neither applauded nor encouraged!; Point to each other from administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.