सांगलीत गुंड म्हमद्या नदाफकडून एकावर गोळीबार, मध्यरात्रीच्या सुमारास घडली घटना

By घनशाम नवाथे | Published: November 15, 2024 01:37 PM2024-11-15T13:37:57+5:302024-11-15T13:38:30+5:30

स्थानिक गुन्हे अन्वेषणकडून तत्काळ अटक

one was shot by gangster Mhamdya Nadaf In Sangli | सांगलीत गुंड म्हमद्या नदाफकडून एकावर गोळीबार, मध्यरात्रीच्या सुमारास घडली घटना

सांगलीत गुंड म्हमद्या नदाफकडून एकावर गोळीबार, मध्यरात्रीच्या सुमारास घडली घटना

सांगली : सांगलीतील कुख्यात गुंड महंमद ऊर्फ म्हमद्या जमाल नदाफ आणि चार साथीदारांनी सांगलीत गणेशनगर येथे सलीम मकबुल मुजावर (वय ४२, रा. गणेशनगर) याच्यावर गोळीबार केला. गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. गोळीबाराच्या घटनेनंतर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने कोल्हापूर जिल्ह्यात म्हमद्याला अटक केली. गोळीबारप्रकरणी म्हमद्यासह संशयित इम्रान दानवडे, पप्पू फाकडे, फारूख मुबारक नदाफ (रा. सांगली) यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

गुंड म्हमद्या नदाफ आणि टोळीला सांगलीतील संजयनगर येथील मनोज माने याच्या खुनानंतर ‘मोका’ लावला होता. कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याला महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात वास्तव्य न करण्याच्या अटीवर जामिन मंजूर केला होता. त्यानंतर गतवर्षी त्याला गोवा येथे सोडले होते. तरीही सांगली जिल्ह्यात त्याच्या टोळीच्या कारवाया सुरू होत्या. नुकतेच काही दिवसापूर्वी म्हमद्याच्या साथीदारांची आणि मिरजेतील काझी टोळीतील सदस्यांची हाणामारी झाली होती. आर्थिक वादातून हा प्रकार घडला होता. त्यामुळे म्हमद्या पुन्हा चर्चेत आला होता.

सांगलीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार पप्पू फाकडे आणि इम्रान दानवडे हे म्हमद्याच्या संपर्कात होते. फाकडे आणि दानवडे यांच्यातील आर्थिक देवघेवीमधून सलीम मुजावर याच्याशी वाद झाला होता. त्यामुळे फाकडे आणि दानवडे या दोघांनी कट रचून म्हमद्यामार्फत मुजावर याला बोलवून काटा काढण्याचे ठरवले होते. त्यानुसार गणेशनगर येथील सर्वधर्म चौकात मुजावर याला बोलवून घेतले. तेव्हा म्हमद्याने त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला. मुजावर याच्या बरगडीत गोळी घुसल्यामुळे तो जखमी झाला. त्यानंतर संशयित तेथून पसार झाले.

गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक संदीप घुगे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे, सांगली शहरचे निरीक्षक संजय मोरे आदींनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर गुन्हे अन्वेषणचे पथक म्हमद्याच्या मागावर होते. त्याला शुक्रवारी पहाटे कोल्हापूर जिल्ह्यात ताब्यात घेतले.

२३ गुन्हे दाखल

गुंड म्हमद्यावर खून, खुनाचा प्रयत्न, आर्म ॲक्ट, मारामारी असे तब्बल २३ गुन्हे दाखल आहेत. महाराष्ट्र व कर्नाटकात बंदी असताना देखील तो त्याची टोळी चालवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलिस त्याच्यावर काय कारवाई करणार? याकडे लक्ष लागले आहे.

Web Title: one was shot by gangster Mhamdya Nadaf In Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.