तिकोंडी खूनप्रकरणी एकास जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 11:51 PM2017-07-19T23:51:51+5:302017-07-19T23:51:51+5:30
तिकोंडी खूनप्रकरणी एकास जन्मठेप
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून सुरेश विठ्ठल हिंचगिरी (वय ३२, रा. तिकोंडी, ता. जत) यांचा खून केल्याप्रकरणी रामगोंडा शिवगोंडा अमृतट्टी (२८) याला येथील अतिरिक्त सत्रन्यायाधीश जी. ए. रामटेके यांनी जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. पुरावा नष्ट करण्यासाठी मदत केल्याप्रकरणी रामगोंडा याचा भाचा कांतेश आमगोंडा वाडेद (२१) याला २ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. याबाबत माहिती अशी की, मृत सुरेश हिंचगिरी हा आई-वडील, भाऊ मदगोंडा, त्यांची पत्नी पूजा व बहीण सुजाता यांच्यासह तिकोंडी येथे शेतात राहत होता. आरोपी रामगोंडा याला त्याच्या पत्नीचे सुरेश याच्याशी अनैतिक संबंध असल्याची कुणकुण लागली होती. १२ सप्टेंबर २०१३ रोजी आरोपी रामगोंडा सुरेशच्या घरी आला होता. दोघेही एकत्रितच घराबाहेर पडले. सुरेश मोटारसायकलीवरून, तर रामगोंडा ट्रॅक्टर घेऊन त्याच्या घरातून गेले. तेव्हापासून सुरेश घरी परत आला नाही. ही बाब सुरेशच्या भावाची पत्नी पूजा हिने मदगोंडा यांना सांगितली. सुरेशचा भाऊ मदगोंडा याने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. रामगोंडा यांच्या ट्रॅक्टरवरील चालकाकडेही त्यांनी चौकशी केली. त्याने मृत सुरेश व रामगोंडा मोटारसायकलीवरून गेल्याचे सांगितले. सुरेशची मोटारसायकल गावातील कमाल सनदी यांच्या घरासमोर मिळून आली. मदगोंडा यांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता, सुरेश शौचास जातो असे सांगून ओढ्याच्या दिशेने गेल्याचे सांगितले. त्यानंतर नातेवाइकांनी सुरेशचा शोध घेतला, पण तो मिळून आला नाही.
भाऊ मदगोंडा यांनी उमदी पोलीस ठाण्यात सुरेश बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली. दरम्यान, रामगोंडा याच्या पत्नीशी सुरेशचे अनैतिक संबंध होते. त्यातून दोघांत अनेकवेळा वादही झाले होते. यातून रामगोंडा याने सुरेशचा घातपात केला असावा, असे मदगोंडा यांनी पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी रामगोंडा याच्यावर गुन्हा दाखल करून त्याची कसून चौकशी केली. पोलिसांच्या चौकशीत रामगोंडा याने अनैतिक संबंधातून सुरेश याचा कुऱ्हाडीने मानेवर, गळ्यावर वार करून खून केल्याची कबुली दिली. या खुनात सुरेश याचा मृतदेह पोत्यात घालून नदीत टाकण्यात आला होता. या कामात रामगोंडा याचा भाचा कांतेश वाडेद याने मदत केली होती. त्यालाही पोलिसांनी अटक केली.
या दोघांवर जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी पौर्णिमा चौगुले यांनी या प्रकरणाचा तपास केला होता. या खटल्यात १७ साक्षीदार तपासण्यात आले. त्यांच्या साक्षी ग्राह्य धरून अतिरिक्त सत्र न्यायाधीश रामटेके यांनी रामगोंडा याला जन्मठेप व त्याचा भाचा कांतेश याला दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.
या खटल्यातील सर्व साक्षीदार कन्नडभाषिक होते. त्यांचे जबाब, साक्षी या कन्नडमधून झाल्या.
अधिवक्ता आनंद व्यंकटेश देशपांडे यांनी त्याचे भाषांतर करून न्यायदानास सहकार्य केले.
तसेच उमदी पोलीस ठाण्याचे कर्मचारी मोहिद्दीन मुजावर, वंदना मिसाळ, रमा डांगे, सुप्रिया भोसले यांनीही खटल्यात महत्त्वाची कामगिरी बजाविली.
यात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता स्मिता शिंदे यांनी काम पाहिले.