कांद्याने आणले डोळ्यांत पाणी!
By admin | Published: March 8, 2017 11:29 PM2017-03-08T23:29:25+5:302017-03-08T23:29:25+5:30
शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी : हमीभाव मिळण्याची मागणी
कापडगाव : देशभरात कांद्याच्या दरात कमालीची घसरण सुरूच असून, या आठवड्यात लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीत चांगल्या कांद्याला पाचशे रुपये तर दोन नंबर कांद्यास दोनशे-तीनशे रुपये दर मिळत असून, कांद्याच्या या ढासळलेल्या किमतीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी येत आहे. मोठ्या आशेने लावलेल्या या कांदा पिकविणाऱ्या शेतकऱ्यांची मागील चार महिन्यांपासून ससेहोलपाट होत असून, सातत्याने कांद्याच्या दरात घसरण होत आहे.
लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीत आजूबाजूच्या तीस ते चाळीस गावांचा कांदा विक्रीस येत असतो. दरवर्षी बाजार समितीमध्ये कांद्याच्या उलाढालीतून शेतकऱ्यांची चाळीस ते पन्नास कोटी रुपयांची उलाढाल होते. याच कांदा उत्पादक शेतकऱ्यास मिळणाऱ्या पैशातून लोणंदची बाजारपेठ चालते. मात्र, सध्या कांद्याच्या या घसरणीमुळे लोणंदची बाजारपेठही ठप्प झाली आहे. (वार्ताहर)
लिलाव सुरू अन् भाव कोसळले..
शासनाने मागील वर्षी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रती क्विंंटल १०० रुपये प्रमाणे अनुदान जाहिर केलेले होते ते आजही शेतकऱ्यांना मिळाले नसून शेतकरी वर्ग शासकीय यंत्रणेवर कमालीचा नाराज आहे. वास्तविक कांदा हा जीवनावश्यक वस्तू असतानाही कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष नेहमीच दुर्लक्ष करीत आले आहे. कांद्याची निर्यात सुरु होऊन भावात सुधारणा होण्याची अपेक्षा असताना कांद्याचे भाव अचानक आणखी गडगडले आहेत. लोणंद मार्केटयार्डवर गुरुवारी कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली. गुरुवारी सकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव सुरु झाले तेव्हा बाजारात कांद्याचे भाव कोसळले.