मिरजमध्ये ऑनलाईन कॅसिनो जुगार अड्डा उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:27 AM2021-03-26T04:27:13+5:302021-03-26T04:27:13+5:30
सांगली : मिरज येथील मंगळवार पेठ परिसरात संगणकावर चालणारा कॅसिनो जुगार अड्डा स्थानिक गुन्हे अन्वेेषण शाखेच्या पथकाने उद्ध्वस्त केला. ...
सांगली : मिरज येथील मंगळवार पेठ परिसरात संगणकावर चालणारा कॅसिनो जुगार अड्डा स्थानिक गुन्हे अन्वेेषण शाखेच्या पथकाने उद्ध्वस्त केला. याप्रकरणी जुगार अड्डा मालक ओंकार सदाशिव देसाई (वय २२, रा. विजयनगर, म्हैसाळ) याच्यासह अक्षय संजय बजंत्री (२३) आणि रोहन राजू कांबळे (२५, दोघेही रा. शनिवार पेठ, मिरज) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून रोख चार हजार ७५० रुपयांसह एक लाख ३० हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कडक कारवाईचे निर्देश पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे पथक मिरज भागात गस्तीवर असताना, मिरज शहरातील आशा टॉकीजजवळील एका इमारतीच्या तळमजल्यात बेकायदेशीरपणे संगणकावर कॅसिनो नावाचा जुगारअड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने छापा टाकला असता, देसाई हा मालक, तर इतर दोन ग्राहक आढळून आले. १ रुपयास ३६ रुपये असा दोन ॲपच्या माध्यमातून संगणकावर जुगाराचा खेळ खेळण्यास आमिष दाखवले जात होते. या ठिकाणाहून पाच संगणक, डोंगल यासह रोकड जप्त करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अभिजित सावंत, संजय कांबळे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.