CoronaVirus Lockdown : सांगलीत आनलाईन सौदे;९४ टन बेदाण्याची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 03:37 PM2020-05-14T15:37:17+5:302020-05-14T15:38:47+5:30
सांगली : जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक आणि बाजार समितीच्या प्रयत्नामुळे अखेर ई-नामद्वारे आनलाईन पध्दतीने पाच दुकानांतील ९४ टन बेदाण्याची विक्री ...
सांगली : जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक आणि बाजार समितीच्या प्रयत्नामुळे अखेर ई-नामद्वारे आनलाईन पध्दतीने पाच दुकानांतील ९४ टन बेदाण्याची विक्री झाली. चांगल्या प्रतीच्या बेदाण्यास किलोला १८० ते १८५, तर मध्यम प्रतीच्या बेदाण्यास १४० ते १६५ रुपये दर मिळाला.
लॉकडाऊनमुळे सांगली आणि तासगावमध्ये बेदाण्याचे सौदे बंद होते. बुधवारी ते आॅनलाईन पध्दतीने सुरू झाले. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांच्या आदेशानुसार सोशल डिस्टन्सिंग पाळून ते काढण्यात आले.
सांगली बेदाणा हॉलमध्ये आॅनलाईन प्रक्रिया राबवली गेली. यावेळी जिल्हा उपनिबंधक करे, बाजार समिती सभापती दिनकर पाटील, बेदाणा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र कुंभार उपस्थित होते.
पहिल्या पाच दुकानांमध्ये प्रत्येकी २५, अशा एकूण १२५ शेतकऱ्यांच्या ६२९० पेट्यांमधील ९४ टन बेदाण्याची विक्री झाली. या सौद्यात चांगल्या प्रतीच्या बेदाण्यास किलोला १८० ते १८५ रुपये, तर मध्यम प्रतीच्या बेदाण्यास १४० ते १६५ रुपये दर मिळाला. काळ्या बेदाण्यास ४० ते ६० रुपये दर मिळाला.
सभापती पाटील म्हणाले, पारदर्शी पध्दतीने बेदाणा सौदे प्रक्रिया राबवली आहे. प्रत्येक पेटीवर डिजिटल कोड चिकटविला होता. त्यात अडत्याचे नाव, शेतकऱ्याचे नाव, किती बॉक्स आहेत याची संपूर्ण माहिती होती. प्रत्येक कलमाच्या पुढे ई-टेन्डरनुसार खरेदीदाराने आॅनलाईन दर भरले होते.
दुपारी एक ते दोनपर्यंत आॅनलाईन प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानंतर प्रत्येक कलमाला कोणत्या खरेदीदाराने जास्तीत जास्त दर लावला आहे, त्याला व अडत्याला बाजार समितीने यादी दिली. त्यानंतर अडत्यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या मालाच्या दराची माहिती देऊन बेदाण्याची विक्री केली.
कुमार दरूरे, प्रशांत कदम, अनिल पाटील, विनायक घाडगे यांनी नियोजन केले. यावेळी माजी महापौर सुरेश पाटील, अशोक बाफना, भावेश मजेठीया, कांतिभाई पटेल, दिलीप ठक्कर, शरद पाटील, पप्पू मजलेकर, सतीश पटेल, सुशील हडदरे, अरविंद ठक्कर, तुषार शहा, विनित गिड्डे, नितीन मर्दा, गगन अग्रवाल, संभाजी पाटील, मनीष मालू उपस्थित होते.