आता एसटी तिकिटाचेही पैसे द्या ऑनलाइन!, सुट्या पैश्याची कटकट मिटणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 12:42 PM2022-12-05T12:42:41+5:302022-12-05T12:43:10+5:30
ऑनलाइन पेमेंट सुविधेमुळे वाहकांच्या अनेक कटकटी संपणार
संतोष भिसे
सांगली : ऑनलाइन पेमेंटने सारे व्यवहार व्यापलेले असताना एसटी सेवा मात्र अद्याप त्यापासून दूरच आहे. प्रवासामध्ये तिकिटासाठी अजूनही रोख पैसे द्यावे लागतात. सुट्या पैशांसाठी वाहकासोबत अजूनही वाद घालावा लागतो. बदलत्या काळात एसटीनेही बदलण्याचा निर्णय घेतला असून, ऑनलाइन पैसे देण्याची सुविधा लवकरच उपलब्ध केली जाणार आहे.
वाहकांना अँड्रॉईड प्रणालीवर आधारित तिकीट मशिन्स देण्यात येणार आहेत. त्याद्वारे प्रवाशाकडून ऑनलाइन पेमेंट स्वीकारता येणार आहे. प्रवाशाने दिलेले पैसे थेट महामंडळाकडे जमा होणार आहेत, त्यामुळे ड्युटी संपल्यावर आगारात कॅशिअरकडे पैसे जमा करून हिशोब देण्याची कटकट संपणार आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासात हजारो रुपयांची रोकड सांभाळण्याची जबाबदारीही कमी होणार आहे.
मुक्कामाला गेलेल्या लांब पल्ल्याच्या गाडीतील वाहकाला जा झालेले पैसे सोबत घेऊनच एसटीमध्ये रात्र काढावी लागते. कोकणात मुक्कामाला गेलेल्या वाहकांना तर पैसे सांभाळत झोपण्याशिवाय पर्याय नसतो. नव्या प्रणालीमुळे त्यांची डोकेदुखी कमी झाली आहे. ड्युटी संपल्यावर विशिष्ट वेळेच्या आत आगारात पैसे जमा करावे लागतात, अन्यथा वाहकांना कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागतो. ऑनलाइन पेमेंट सुविधेमुळे या साऱ्या कटकटी संपणार आहेत. प्रवाशांना डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, गुगल पे, फोन पे आदी ऑनलाइन पेमेंट प्रणालींद्वारे पैसे देऊन तिकीट काढता येईल.
मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महामंडळाची महत्त्वाची बैठक आठवडाभरापूर्वी झाली, त्यामध्ये झालेल्या अनेक निर्णयांसोबत ऑनलाइन व्यवहारांचाही निर्णय झाला. वाहकांकडील तिकिटांची सध्याची ईटीआय मशिन्स अँड्रॉईड प्रणालीला जोडण्याचे ठरले.