सांगलीच्या पुरोहित कन्या शाळेत आॅनलाईन संस्कृत-: पाचशे विद्यार्थिनींचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 12:29 AM2019-01-17T00:29:52+5:302019-01-17T00:30:52+5:30
येथील सांगली शिक्षण संस्था संचलित ग. रा. पुरोहित कन्या प्रशालेने हायटेक पाऊल उचलून आॅनलाईन संस्कृत सराव चाचणी सुरू केली आहे. मुंबईच्या बालग्यानी शैक्षणिक संस्थेच्या सहकार्याने ही चाचणी घेतली जात
सांगली : येथील सांगली शिक्षण संस्था संचलित ग. रा. पुरोहित कन्या प्रशालेने हायटेक पाऊल उचलून आॅनलाईन संस्कृत सराव चाचणी सुरू केली आहे. मुंबईच्या बालग्यानी शैक्षणिक संस्थेच्या सहकार्याने ही चाचणी घेतली जात असून, यामध्ये इयत्ता आठवी व नववीच्या पाचशे विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला आहे.
संस्थेतर्फे तंत्रज्ञानातून विद्यार्थ्यांचा विकास तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा संस्कृत अध्यापनामध्ये वापर यादृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकणारी ही जिल्ह्यातील पहिली शाळा आहे. संस्कृत व्याकरणावर आधारित चाचणी असून, ती विद्यार्थ्यांना संगणक, मोबाईल आदींच्या साहाय्याने घरबसल्या सोडवता येणार आहे. त्यातील मिळालेले गुण व उत्तर चुकीचे असल्यास बरोबर उत्तर याचेही मार्गदर्शन यातून मिळणार आहे. या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून प्रशालेच्या विद्यार्थिनीसुद्धा आपल्या फावल्या वेळेचा सदुपयोग करू शकतात.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या वाढीसाठी अशाप्रकारचे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष नितीन खाडिलकर यांनी दिली. या चाचणीचे संयोजन संस्कृत शिक्षक रघुवीर रामदासी यांनी केले. यासाठी प्रिया कुलकर्णी, वर्षा कुलकर्णी हे मार्गदर्शन करत आहेत. प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रद्धा केतकर, उपमुख्याध्यापक भारत घाडगे यांनी शालेय स्तरावर ही चाचणी सोडवता यावी, यासाठी नियोजन केले आहे.