‘कुस्ती हेच जीवन’ संघटनेकडून ऑनलाईन कुस्ती मैदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:30 AM2021-01-08T05:30:25+5:302021-01-08T05:30:25+5:30
गेले वर्षभर कोरोनाचे संकट अवघ्या जगावर असल्याने कुस्तीबरोबर इतर सर्वच खेळांचे नुकसान झाले. त्यात कुस्ती क्षेत्राचे जास्तच नुकसान ...
गेले वर्षभर कोरोनाचे संकट अवघ्या जगावर असल्याने कुस्तीबरोबर इतर सर्वच खेळांचे नुकसान झाले. त्यात कुस्ती क्षेत्राचे जास्तच नुकसान झाल्याने अनेक पैलवानांनी कुस्ती खेळणे सोडून रोजंदारी सुरू केली आहे. कुस्ती मैदाने परत सुरू व्हावीत व यातून खेळाडूंना खुराकासाठी थोडी आर्थिक मदत व्हावी, या उद्देशाने शिराळा व शाहुवाडी तालुक्यातील ''''कुस्ती हेच जीवन''''च्या टीमने विविध ठिकाणी स्थानिक लोकांच्या सहकार्याने ऑनलाईन कुस्ती मैदान घेण्याचे सुरू केले आहे.
याप्रमाणे पहिले मैदान दि. १० जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता शाहुवाडी तालुक्यातील तुरूकवाडी येथे दत्तसेवा विद्यालयाच्या पटांगणावर घेण्यात येणार असल्याची माहिती शिराळा तालुका अध्यक्ष मनोज मस्के यांनी दिली. या मैदानात प्रथम क्रमांकासाठी विकास पाटील (मांगरूळ) विरुद्ध प्रदीप ठाकूर (सांगली), क्रमांक दोनची कुस्ती उदय खांडेकर (वारणानगर) विरुद्ध अंजीर पाटील (कोल्हापूर) अशा एकूण पंचवीस लढती होणार आहेत.
हे मैदान हे कुस्ती हेच जीवन फेसबुक पेज व यु ट्युब चॅनलवर लाईव्ह स्वरूपात होणार आहे. मैदान शासनाने घालून दिलेल्या अटी व शर्तीनुसार मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत होणार असून, मैदानासाठी कुस्ती हेच जीवन महाराष्ट्र राज्य संस्थापक रामदास देसाई सर व अध्यक्ष अनिल पाटील उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर शिराळा व शाहुवाडी तालुक्यातील आमदारही उपस्थित राहणार आहेत.