सांगली जिल्ह्यातील तलावांमध्ये केवळ १३ टक्केच पाणीसाठा, आता ‘वरुण राजा’चीच आस
By अशोक डोंबाळे | Published: May 23, 2024 06:03 PM2024-05-23T18:03:14+5:302024-05-23T18:03:30+5:30
कोयनेत २५.४५ टक्के, तर वारणेत ३५.१८ टक्के पाणी
अशोक डोंबाळे
सांगली : जिल्ह्यातील ८३ पैकी ४४ छोटे-मोठे तलाव कोरडे पडले असून, उर्वरित तलावांमध्ये केवळ १३ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. सांगली जिल्ह्याची टंचाईमध्ये तहान भागविणाऱ्या कोयना धरणात २५.४५ टक्के, तर वारणा धरणात ३५.१८ टक्के पाणी आहे. आता वरुण राजा वेळेवर बरसला, तरच या पाणीटंचाईतून दुष्काळग्रस्तांची सुटका होणार आहे.
जिल्ह्यात २०२३ च्या हंगामात पावसाचा लहरीपणा पाहायला मिळाला. काही ठिकाणी सरासरी, तर काही ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. पुरेसा पाऊस झाला नसल्याने तलाव, धरणातही अपेक्षित पाणीसाठा झाला नाही. त्यात पिकांना काही पाणी सोडले होते. कोयना धरणात २६.७९ टीएमसी, म्हणजे २५.४५ टक्के, तर वारणा धरणात १२.०९ टीएमसी, म्हणजे ३५.१५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. आता धरणातील पाणीसाठा कमी झाला असून, जिल्ह्यातील तापमानाचा पारा ४० अंशांवर पोहोचला आहे. त्यामुळे पाण्याच्या बाष्पीभवनचा वेगही वाढला आहे. दररोज पाणीसाठा खालावत चालला आहे. अनेक जलसाठे कोरडे पडत आहेत.
जिल्ह्यात मोरना (ता. शिराळा), सिद्धेवाडी (ता. तासगाव), बसाप्पावाडी (ता. कवठेमहांकाळ), संख, दोडनाला (ता. जत) हे पाच मध्यम प्रकल्प असून, तिथे १ हजार ७६० दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याची क्षमता आहे. सध्या केवळ ६२ दशलक्ष घनफूट पाणीसाठा म्हणजे ४ टक्केच आहे. छोट्या पाझर तलावांची ७८ संख्या असून, त्याची सहा हजार १५ दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याची क्षमता आहे. या प्रकल्पात सध्या केवळ ९८३ दशलक्ष घनफूट पाणीसाठा असून, तो १६ टक्के आहे.
२५ तलाव कोरडे १९ तलावांत मृत पाणीसाठा
जिल्ह्यातील ८३ पाझर तलावांपैकी २५ तलाव कोरडे ठणठणीत असून, १९ तलावांमध्ये मृत पाणीसाठा आहे. आठ तलावांमध्ये २५ टक्क्यांवर पाणी असून, एका तलावामध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त पाणी आहे. ७५ टक्के पाणीसाठा खानापूर, कडेगाव, शिराळा तालुक्यांतील प्रत्येकी एका तलावाचा समावेश आहे. आटपाडी तालुक्यातील दोन तलाव टेंभू योजनेच्या पाण्यातून पूर्ण भरलेले आहेत.
जिल्ह्यातील तलावांमधील पाणीसाठा
तालुका - तलाव संख्या - पाण्याची टक्केवारी
तासगाव - ७ - १
खानापूर - ८ - १६
कडेगाव - ७ - ३६
शिराळा - ५ - १६
आटपाडी - १३ - ३३
जत - २७ - ०३
क. महांकाळ - ११ - १२
वाळवा - ३ - १३
मिरज - २ - १०
एकूण - ८३ - १३
गतवर्षीच्या तुलनेत १२ टक्के कमी पाणीसाठा
जिल्ह्यातील ८३ पाझर तलावांमध्ये १५ मे २०२३ रोजी एक हजार ९२९.७६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता. टक्केवारीत म्हटले, तर २५ टक्के होता. यावर्षी १५ मे २०२४ रोजी एक हजार ४५.३५ घनफूट पाणीसाठा असून, तो १३ टक्के आहे. दोन्ही वर्षांची तुलना केल्यास गतवर्षीपेक्षा यावर्षी चक्क १२ टक्के पाणीसाठा कमी आहे. मान्सून १५ जूनपर्यंत सांगली जिल्ह्यात येईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे, म्हणजे महिनाभर पाणी पुरेल, असे नियोजन प्रशासनाला करावे लागणार आहे.
जिल्ह्यात टँकरचे शतक
जिल्ह्यातील जत, आटपाडी, शिराळा तालुक्यांतील ८४ गावे आणि ६२९ वाड्या-वस्त्यांमधील एक लाख ९९ हजार २६४ लोकसंख्येला १०८ टँकरने पाणीपुरवठा होत आहे, तसेच परिसरातील तलाव कोरडे पडल्यामुळे ३७ हजार ८१५ पशुधनालाही टँकरच्या पाण्याचाच आधार आहे.