जत तालुक्यात फक्त २० टक्के कोरोना लसीकरण, प्रतिसाद नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:30 AM2021-07-14T04:30:24+5:302021-07-14T04:30:24+5:30
सांगली : जिल्ह्यात जत तालुक्यात लसीकरणाला अत्यंत कमी प्रतिसाद मिळत आहे. तेथे जनजागृती मोहीम राबविण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत ...
सांगली : जिल्ह्यात जत तालुक्यात लसीकरणाला अत्यंत कमी प्रतिसाद मिळत आहे. तेथे जनजागृती मोहीम राबविण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
जिल्ह्यात आजवर ७ लाख ३८ हजार ९९५ जणांना पहिला डोस तर २ लाख १२ हजार ८०१ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. ३२ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे. अन्य तालुक्यांच्या तुलनेत जतमध्ये कमी झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याचा आढावा घेऊन सांगितले की, जतमध्ये लोकप्रतिनिधी, आशा कार्यकर्त्या यांच्यामार्फत जनजागृती करावी. लसींचा जादा पुरवठा करावा. लसीकरण केंद्रेही वाढवावीत. खासगी लसीकरण केंद्रांची काटेकोर तपासणी करावी. तेथे सुविधा आवश्यक आहेत. या केंद्रांना मंजुरी देता नियमांची पूर्तता आवश्यक आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी लसीकरण मोहीम, अतिसार नियंत्रण पंधरवडा, रोगप्रतिकारशक्ती वृध्दी कार्यक्रम आराखडा आदींचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, आरोग्याधिकारी डॉ. मिलिंद पोरे, लसीकरण समन्वयक डॉ. विवेक पाटील, डॉ. वैभव पाटील आदी उपस्थित होते.
आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर यांना दुसरा डोस प्राधान्याने देण्याची सूचना त्यांनी केली. नगरपालिका, नगरपरिषद हद्दीत लसीचा पुरेसा साठा देण्यास सांगितले. सध्या ३७७ लसीकरण केंद्रे असून यामध्ये ३९ खासगी आहेत.
चौकट
तालुकानिहाय लसीकरणाची टक्केवारी अशी
आटपाडी ३४, जत २०, कडेगाव ३७, कवठेमहांकाळ ३४, खानापूर २८, मिरज ३३, पलूस ३०, शिराळा ४२, तासगाव ३६, वाळवा ३८, महापालिका २८, जिल्हा एकूण ३२ टक्के.