पाणी जपून वापरा, सांगली जिल्ह्यात २८ टक्केच पाणीसाठा शिल्लक

By अशोक डोंबाळे | Published: February 7, 2024 03:49 PM2024-02-07T15:49:03+5:302024-02-07T15:49:41+5:30

दुष्काळी तीव्रता वाढली : विहिरी, कूपनलिकांनी तळ गाठला 

Only 28 percent water reserve is left in Sangli district, Drought severity increased | पाणी जपून वापरा, सांगली जिल्ह्यात २८ टक्केच पाणीसाठा शिल्लक

पाणी जपून वापरा, सांगली जिल्ह्यात २८ टक्केच पाणीसाठा शिल्लक

अशोक डोंबाळे

सांगली : यंदाच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पात अपेक्षित पाणीसाठा झाला नाही. त्यामुळे यंदा लवकरच टंचाईचे ढग येण्याची भीती आहे. जिल्ह्यातील ८३ प्रकल्पांत केवळ २८ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे आगामी दोन महिन्यांची चिंता जिल्हावासीयांना लागली असून, पाणी काटकसरीने वापरण्याची वेळ आली आहे.

यंदाच्या पावसाळ्यात उशिरा पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे खरिपाच्या पेरण्याही उशिरा झाल्या. साधारणत: जूनअखेरपासून पेरणीस सुरुवात झाली. रिमझिम पाऊस झाल्याने पिकांची चांगली उगवण झाली; मात्र पाणीसाठ्यात कुठलीही वाढ झाली नाही. जिल्ह्यात मध्यम आणि लघु ८३ प्रकल्प असून त्याची नऊ हजार ४४० दशलक्ष घनफूट पाणी साठविण्याची क्षमता आहे. या प्रकल्पांमध्ये सध्या दोन हजार १९८ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा आहे.

सिद्धेवाडी (ता. तासगाव), मोरणा (ता. शिराळा), दोड्डनाला, संख (ता. जत), बसाप्पावाडी (ता. कवठेमहांकाळ) या मध्यम प्रकल्पात गतवर्षी ७० टक्के तर सध्या केवळ १९ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. ७८ लघुप्रकल्प असून त्यामध्ये गतवर्षी ६५ टक्के पाणीसाठा होता. यावर्षी ३१ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे.

१७ तलाव कोरडे

तासगाव तालुक्यात एक, आटपाडी दोन, जत ११, कवठेमहांकाळ तीन असे १७ तलाव कोरडे पडले आहेत. तसेच मिरज तालुक्यातील एक, खानापूर तीन, तासगाव एक, जत चार आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील दोन तलावांमध्ये मृत पाणीसाठा आहे. पिण्यासाठी पाणी उपयोगी नाही, अशी स्थिती आहे. यामुळे या परिसरातील पिकं वाळली असून पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे.

आटपाडी, जत तालुक्यातील ५४ गावांना टँकरने पाणी

जत तालुक्यातील निगडी खु., शेड्याळ, सिंदूर, पांढरेवाडी, वळसंग, एकुंडी, हळ्ळी, बसर्गी, सोन्याळ, सालेगिरी, पाच्छापूर, कुडनूर, वायफळ, गुगवाड, गिरगाव, संख, जाडरबोबलाद, काराजनगी, उमराणी, तिकोंडी, बेळोडंगी, मोकाशेवाडी, टोणेवाडी, माडग्याळ, सोनलगी, मुचंडी, जालीहाळ खु., कागनारी, दरीबडची, कोलगिरी, को.बोबलाद, लमाणतांडा, केरेवाडी, व्हसपेठ, खैराव, खंडनाळ, गुलगुंजनाळ, दरिकुणूर, सिद्धनाथ, सुसलाद, पांडोझरी, सोरडी, खोजनवाडी, तिल्ल्याळ, गोंधळेवाडी, अंकलगी, मोटेवाडी आदी ५० गावांमध्ये आणि आटपाडी तालुक्यातील आंबेवाडी, पुजारवाडी, विठ्ठलापूर, उंबरगाव या गावांसह ५४ गावांमध्ये टँकर सुरू आहेत.

प्रकल्पातील (तलाव) पाणीसाठ्याची स्थिती

तालुका पाणीसाठा तलाव 
तासगाव १८
खानापूर १९
कडेगाव ४६
शिराळा ४६५ 
आटपाडी ४९१३
जत १८२७ 
क.महांकाळ १९११
मिरज २५०३ 
वाळवा २३०२ 

Web Title: Only 28 percent water reserve is left in Sangli district, Drought severity increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.