प्रति एकर केवळ ६० हजार रूपये भरपाई
By admin | Published: January 18, 2015 11:40 PM2015-01-18T23:40:54+5:302015-01-19T00:32:26+5:30
तिकुंडी येथील प्रकार : भू-संपादनास शेतकऱ्यांच्या विरोधामुळे साठवण तलावाचे काम रखडले
दरीबडची : तिकोंडी (ता. जत) येथील साठवण तलावासाठी ९३ शेतकऱ्यांची ७५ एकर ५९ गुंठे जमीन पाच वर्षांपूर्वी संपादित करण्यात आली आहे. शासकीय दरानुसार संपादन केलेल्या जमिनीची प्रति एकर फक्त ६० हजार दराने भरपाई मंजूर झाली आहे.
सध्याच्या बाजारभावाप्रमाणे भरपाई कमी आहे. केंद्राने भू-संपादनाच्या भरपाईसाठी नवीन तरतुदी केल्या आहेत. या केलेल्या तरतुदीनुसार बाजारमूल्याच्या चौपट भरपाई देण्याची आहे. यानुसार भरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. जमिनीची भरपाई कमी असल्याने शेतकऱ्यांकडून स्वीकारली गेली नसल्याने १ कोटी ३४ लाख १४ हजार ४७७ रुपये दोन वर्षांपासून शासनदरबारी पडून आहेत. भरपाईच्या वादात ९३ कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. याकडे भू-संपादन विभागाने लक्ष देऊन केंद्राच्या भू-संपादनप्रमाणे नुकसानभरपाई, पुनर्वसन करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
स्थानिक स्तर विभाग जलसंधारण महामंडळ, औरंगाबादअंतर्गत तिकोंडी साठवण तलावास २०१० मध्ये प्रशासकीय मान्यतादेण्यात आली. तलावाची मूळ रक्कम ५ कोटी १५ लाख रुपये इतकी आहे. जानेवारी २०११ ला टेंडर काढण्यात आले. टेंडर रक्कम ३ कोटी ५० लाख आहे. हिरवे कन्स्ट्रक्शन, पंढरपूर यांच्याकडून कामाला सुरुवात करण्यात आली. कामाचा कालावधी २४ महिन्यांचा आहे. तलावाची साठवण क्षमता ४८ दक्षलक्ष घनफूट आहे. बुडीत क्षेत्र ३० हेक्टर आहे, तर सांडवा लांबी १४८ मीटर आहे. ओलिताखाली येणारे क्षेत्र २४९ हेक्टर आहे. शेतकऱ्यांनी विरोध केल्याने काम गेली चार वर्षे रखडले आहे. सध्या तलावाचे काम २० टक्के झाले आहे.
भू-संपादन विभागाने पाच वर्षांपूर्वी जमीन भू-संपादित केली आहे. भू-संपादन ८-अ ची नोटीस पाठविली आहे. त्यानुसार कब्जापट्टी ही करण्यात आली आहे. तलावात घरे, विहीर, कूपनलिका, डाळिंब बाग गेली आहे. बागायत व जिरायत जमीन गेली आहे. ९३ कुटुंबांची घरे गेल्याने ही कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. शासकीय दरानुसार संपादन केलेल्या जमिनीचा दर ठरविला असून, त्यानुसार १ कोटी ३४ लाख १४ हजार ४७७ रुपये रक्कम मंजूर झाली आहे. (वार्ताहर)
सध्याच्या बाजारभावाप्रमाणे ही नुकसानभरपाई तुटपुंजी आहे. केंद्राच्या नियमाप्रमाणे भरपाई मिळाली पाहिजे. नाही तर तलाव होऊ देणार नाही. तलावामध्ये आत्मदहन करण्याची तयारी आहे.
-मल्लाप्पा बळूर,
शेतकरी, तिकोंडी
तलावाचे भू-संपादन झाले आहे. कब्जेपट्टी झाली आहे. शासननियमाप्रमाणे नुकसानभरपाई मिळणार आहे. शेतकऱ्यांनाही सहकार्य करावे. तलावाच्या कामाला सुरुवात होणार आहे.
- अभिमन्यू तेली, शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग, जत
बावीस एकराची भरपाई साडेतेरा लाख?
तलावासाठी भू-संपादन विभागाने मल्लाप्पा बळूर, विठ्ठल महाजन, यल्लव्वा बळूर, शंकर रायगोंड, सखुबाई महाजन, मडीवाळाप्पा जेऊर यांच्यासह २० शेतकऱ्यांची २२ एकर जमीन १३ लाख ५३ हजार ७२० रुपये दराने संपादन केली आहे. म्हणजेच एकराला फक्त ६० हजार इतकीच भरपाई मंजूर झाली आहे.
वीस वर्षांपासून शेतात राहणारे संजीव चन्नाप्पा बळूर या शेतकऱ्याचे पत्र्याचे घर ठेकेदाराने पाडून जमीन सपाट केली आहे. बळूर हे ऊसतोडीला बाहेरगावी गेले होते. गेल्या ४ वर्षांपासून घर नसल्याने कुटुंब घेऊन साबू बळूर यांच्या शेतामध्ये राहात आहेत. बेघर होण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे.