Sangli: मोरणा धरणात अवघा ९ टक्के पाणीसाठा, शिराळा शहरावर पाणीटंचाईचे सावट
By संतोष भिसे | Published: May 11, 2024 04:03 PM2024-05-11T16:03:40+5:302024-05-11T16:04:33+5:30
उद्योगांसाठी वापर वाढला, शेती व पिण्यासाठी आरक्षणाची मागणी
विकास शहा
शिराळा : शिराळा शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या मोरणा धरणातीलपाणीसाठा फक्त अवघा ९ टक्के शिल्लक आहे. त्यामुळे शहरास काही दिवसांनी पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. पिण्यासाठी व शेतीसाठी प्रामुख्याने पाणी देणे आवश्यक आहे; मात्र औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. वाकुर्डे योजनेचे पाणी तातडीने न सोडल्यास शिराळ्यासह अनेक गावांचा पिण्याच्या व शेतीसाठी पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.
वाकुर्डे योजनेचे पाणी मोरणा धरणात ३ मार्च रोजी सोडले होते. त्यावेळी फक्त ४ टक्केच पाणीसाठा वाढला होता. याचा फारसा परिणाम पाणीसाठ्यावर झाला नव्हता. सध्या धरणात २९ टक्के पाणीसाठा असून उपयुक्त पाणीसाठा फक्त ९ टक्केच आहे. धरणातून मोरणा नदीत सोडण्यात येणाऱ्या मुख्य दरवाज्याच्या काढण्यात आलेल्या चाचीमध्ये गाळ साचल्यामुळे २९ एप्रिलमध्ये सोडलेले पाणी कमी दाबाने आल्यामुळे शेतीला पाणी अपुरे पडले होते.
आता सोडण्यात येणाऱ्या आवर्तनावेळी पाणी मिळेल का नाही, अशी अवस्था आहे. पाणी नाही सोडले तर धरणापासून ते मांगलेपर्यंत शेती व पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागेल. या धरणातून नदीत पाच दिवस पाणी सोडण्यात येते. तर दहा दिवस बंद व जलाशयात ५ दिवस उपसा व १० दिवस उपसाबंदी असे नियोजन आहे. धरणातील पाण्यावर पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी २० गावे व प्रामुख्याने शिराळा शहराला व एम.आय.डी.सी. पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. मोरणा धरणाच्या क्षमतेपेक्षा दुप्पट पाणी वापरात येणारा राज्यातील एकमेव मध्यम प्रकल्प आहे. शासनाच्या नियमानुसार वीजबिले आजअखेर शेतकऱ्यांनी भरली असतानाही आमची अवस्था अशी का? असा सवाल शेतकरी करीत आहेत.
धरणाच्या लाभक्षेत्रातील गावे
जलाशयातील : शिराळा, एमआयडीसी तडवळे, उपवळे, अंत्री खुर्द, अंत्री बुद्रुक, पाडळी, पाडळेवाडी
धरणाखालील : बिऊर, भाटशिरगाव, शिंगटेवाडी, जांभळेवाडी, धुमाळवाडी, चिखलवाडी, फकीरवाडी, इंग्रुळ, मांगले व शिराळ्याचा काही भाग.