गोळाबेरीज झाली, तरच पदाधिकारी बदल

By Admin | Published: April 23, 2017 11:50 PM2017-04-23T23:50:21+5:302017-04-23T23:50:21+5:30

पतंगराव कदम : काँग्रेस नगरसेवकांची सांगलीत बैठक, महापौरांच्या कामकाजाबद्दल समाधानी

Only after the mobilized, the office bearers changed | गोळाबेरीज झाली, तरच पदाधिकारी बदल

गोळाबेरीज झाली, तरच पदाधिकारी बदल

googlenewsNext



सांगली : महापौर हारुण शिकलगार, उपमहापौर विजय घाडगे यांना दहा महिन्यांचा कालावधी दिला होता. हा कालावधी संपला आहे. पण राजकीय परिस्थिती बदलल्याने त्यांचे राजीनामे झाले नाहीत. आताही बहुमताची गोळाबेरीज झाली तर महापौर, उपमहापौरांसह गटनेताही बदलला जाईल, असे काँग्रेस नेते आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी रविवारी नगरसेवकांच्या बैठकीत स्पष्ट केले. दरम्यान, काँग्रेसच्या बहुतांश नगरसेवकांनी पदाधिकारी मागणीचा आग्रह धरला होता. या बैठकीला उपमहापौर गटाने मात्र दांडी मारली होती.
महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेस नगरसेवकांची बैठक डॉ. कदम यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीला काँग्रेस नेत्या जयश्रीताई मदन पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील उपस्थित होते. माजी मंत्री प्रतीक पाटील, विशाल पाटील हेही बैठकीला अनुपस्थित होते. बैठकीला काँग्रेसच्या २७ नगरसेवकांनी हजेरी लावली होती. तब्बल तीन तास बंद खोलीत ही बैठक झाली.
बैठकीत नगरसेवकांनी पदाधिकारी बदलासाठी जोर धरला होता. तसेच महापालिकेच्या कामकाजावरही बैठकीत चर्चा झाली. पालिका निवडणुकीतील जाहीरनाम्याच्या पूर्ततेचा आढावा घेण्यात आला. महिला सदस्यांनी डॉ. कदम व श्रीमती पाटील यांच्यासमोर स्वतंत्रपणे म्हणणे मांडले. काँग्रेसअंतर्गत मिरजेतील एका गटाने महापौरांसह गटनेते किशोर जामदार यांनाही लक्ष्य केल्याचे समजते.
बैठकीबाबत पत्रकारांशी बोलताना डॉ. कदम म्हणाले की, काँग्रेसच्या नगरसेवकांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. पालिकेच्या कामकाजासह पदाधिकारी बदलावर बैठकीत चर्चा झाली. महापौर, उपमहापौरांना दहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. पण राजकीय परिस्थिती बदलल्याने पदाधिकारी बदल होऊ शकला नाही. आताही संख्याबळाचे गणित जमवावे लागेल. गोळाबेरीज होत असेल, तर सर्वच पदाधिकारी बदलले जातील. महिला सदस्यांनी ‘वन टू वन मत’ मांडले आहे. त्यामुळे सर्व नेत्यांशी चर्चा करून विचारपूर्वक निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उपमहापौर गटाच्या अनुपस्थितीबाबत ते म्हणाले की, शहर जिल्हाध्यक्षांनी काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांना निमंत्रण दिले होते. पदाधिकारी निवडीवेळी उपमहापौरांचे नाव आम्हीच जाहीर केले आहे. पण ते आले नाहीत, हे दुर्दैव म्हणावे लागेल. पालिकेत गटबाजीचे राजकारण करण्यावर आपण भाष्य करणार नाही. ज्यांना यायचे आहे ते येतील, असा टोलाही त्यांनी लगाविला. महापौर हारुण शिकलगार यांच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करीत त्यांच्या कारभाराबद्दल कोणाचीच तक्रार नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
७० टक्के आश्वासनांची पूर्तता
महापालिका निवडणुकीत काँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. त्यातील ७० टक्के आश्वासनांची पूर्तता गेल्या चार वर्षात झाली आहे. उर्वरित कामे येत्या सहा महिन्यात पूर्ण होतील. त्याशिवाय मे महिन्यात विकास कामांचा धडाका लावला जाणार आहे. त्यात मिरजेच्या शंभर कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे उद््घाटन, २४ कोटींचे रस्ते, ७० एमएलडी योजनेचा प्रारंभ, सांगली व कुपवाडसाठी गॅस दाहिनी, शहरातील दहा आरोग्य केंद्रांचे उद््घाटन अशा विविध कामांचा समावेश आहे, असेही डॉ. कदम यांनी स्पष्ट केले.
उपमहापौर गटाचा बहिष्कार
काँग्रेस नगरसेवकांच्या बैठकीवर उपमहापौर गटाने बहिष्कार टाकला होता. उपमहापौर विजय घाडगे यांच्यासह आठ ते नऊ नगरसेवक बैठकीला अनुपस्थित होते. २७ नगरसेवकांनी बैठकीला हजेरी लावली होती, तर संजय मेंढे, त्यांच्या पत्नी बबीता मेंढे, बसवेश्वर सातपुते व अनारकली कुरणे यांनी शहर जिल्हाध्यक्षांशी संपर्क साधून, वैयक्तिक कारणास्तव बैठकीला उपस्थित राहता येत नसल्याचे कळविले होते.
महापौर पदासाठी तिघे इच्छुक
महपौर पदासाठी सुरेश आवटी, राजेश नाईक, रोहिणी पाटील हे प्रमुख दावेदार आहेत. या तिघांनीही बैठकीच्या निमित्ताने जोरदार फिल्डिंग लावली होती. नेत्यांसमोर आपलेच नाव सांगावे, यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणीही केली होती.
किशोर जामदार यांना लक्ष्य : बैठकीत महापौर, उपमहापौरांसह गटनेते किशोर जामदार यांनाही लक्ष्य करण्यात आले. मिरजेतील नायकवडी, आवटी गटातील नगरसेवकांनी गटनेता बदलाची मागणी बैठकीत केली. सात ते आठ नगरसेवकांनी या मागणीला पाठिंबा दिला, तर उर्वरित १८ ते २० नगरसेवकांनी मात्र गटनेता बदलण्यास विरोध केला. किशोर जामदार यांनाच गटनेता म्हणून कायम ठेवावे, अशी मागणीही या नगरसेवकांनी बैठकीत केल्याचे समजते.
आयुक्तांशी आज चर्चा
बैठकीत काँग्रेस नगरसेवकांनी विकास कामांबाबत तक्रारी केल्या. काही मोजक्याच नगरसेवकांच्या प्रभागात कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. अनेक नगरसेवकांचे प्रभाग विकासापासून वंचित आहेत. त्यांच्या फायली आयुक्तांच्या टेबलावर पडून आहेत, अशा तक्रारी कदम यांच्यासमोर मांडल्या. या वंचित नगरसेवकांच्या विकास कामांबाबत सोमवारी डॉ. कदम हे आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्याशी चर्चा करणार आहेत.

Web Title: Only after the mobilized, the office bearers changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.