इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापकांनाच जमेना इंग्लिश, सांगलीतील सावळजमधील शाळेचा कारनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 04:20 PM2023-07-20T16:20:03+5:302023-07-20T16:21:54+5:30
विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर चूक झाल्याने चर्चा
तासगाव : पालकांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळेची क्रेझ निर्माण झाल्यामुळे या संधीचा फायदा घेत अनेक खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळा गावाेगावी सुरू झाल्या. या शाळेतील शिक्षकांच्या गुणवत्तेबाबत नेहमीच चर्चा होत असते. याच चर्चेला बळ देणारा एक दाखला सध्या चर्चेत आला आहे. तासगाव तालुक्यातील सावळज येथील एका खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्याला शाळा सोडल्याचा दाखला दिला आहे. मात्र, या दाखल्यातच ‘स्पेलिंग मिस्टेक’ असल्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनाच इंग्रजी जमेना का? असा प्रश्न पालकांना पडला आहे.
सावळज येथे पहिली ते चौथीपर्यंत एक खासगी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू आहे. या शाळेतील इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने सावळजमधीलच दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतला. शाळा बदलल्यानंतर पालकांनी संबंधित इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या मुख्याध्यापकांकडे दाखल्याची मागणी केली. शाळेच्या मुख्याध्यापकांनी हा दाखला पालकांना दिला.
मुख्याध्यापकांच्या सही-शिक्यासह विद्यार्थिनीला शाळा सोडल्याचा दाखला देण्यात आला. पालकांनी नव्याने प्रवेश घेतलेल्या शाळेत हा दाखला जमा केला. मात्र, त्यावेळी या दाखल्यावरील चुका पालकांच्या लक्षात आल्या. संबंधित विद्यार्थिनीचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यात झाला आहे. मात्र, या दाखल्यावर कोल्हापूर जिल्ह्याचे स्पेलिंग चुकीचे लिहिल्याचे दिसून आले. संबंधित विद्यार्थिनीने तिसरीत प्रवेश घेतला असतानादेखील दाखल्यावर मुलीची जन्मतारीख १५ जून २०२३ अशी लिहिण्यात आली आहे. त्यामुळे दाखल्यानुसार मुलीचे वय अवघा एक महिनाच आहे का? असा प्रश्न निर्माण झाला.
पालकांना इंग्रजी माध्यमाची भुरळ पाडून विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याचे काम अनेक खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडून सुरू असते. मात्र, या शाळेत शिक्षण देणारे शिक्षक त्या गुणवत्तेचे असतात का? असा प्रश्न या दाखल्याच्या नमुन्यावरून उपस्थित झाला आहे. इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापकांनीच अशा चुका केल्यामुळे हा दाखला चांगलाच चर्चेत आला आहे.
बाेर्डावर नाव एक, दाखल्यावर दुसरेच...
पहिली ते चौथीपर्यंत इंग्रजी माध्यमाची शाळा भरविणाऱ्या या शाळेच्या दाखल्यावर एक नाव आहे. शाळेच्या बाहेर एका इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणाऱ्या फ्रेंचाईझीचा बोर्ड लावला आहे. मुलांना सीबीएसई पॅटर्नचे शिक्षण देत असल्याचा दावा करून ही शाळा सुरू असल्याचे काही पालकांनी सांगितले.