आळसंद तलावाच्या पाहणीचा केवळ फार्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:27 AM2021-05-06T04:27:41+5:302021-05-06T04:27:41+5:30
विटा : माजी आमदार अॅड. सदाशिवराव पाटील यांनी विटा शहराच्या पाण्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे ताकारी योजनेचे पाणी आळसंद ...
विटा : माजी आमदार अॅड. सदाशिवराव पाटील यांनी विटा शहराच्या पाण्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे ताकारी योजनेचे पाणी आळसंद तलावात सोडण्याबाबत विनंती केली होती. त्यामुळे पालकमंत्री पाटील यांनी पाटबंधारे विभागाला तातडीने आदेश देऊन तलावात पाणी सोडण्याची सूचना केली होती. याची माहिती मिळाल्यानंतर काही लोकांनी उगाचच आळसंद तलावाची पाहणी केल्याचा केवळ फार्स केला असल्याची टीका माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी आमदार अनिल बाबर यांचे नाव न घेता केली.
विटा शहरात गेल्या दोन महिन्यांपासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. चार-पाच दिवसानंतर एकदा नागरिकांना पाणी मिळत आहे. त्यामुळे मंगळवारी आमदार अनिल बाबर यांनी आळसंद तलावाची पाहणी केली. यावेळी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक यांच्याशी चर्चा करून आळसंद तलावात ताकारीचे पाणी सोडण्याची सूचना केली होती.
या पार्श्वभूमीवर वैभव पाटील म्हणाले, घोगाव व आळसंद जलशुध्दीकरण केंद्राच्या परिसरात वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, पाईपची गळती व ताकारी योजनेचे आवर्तन लांबल्याने आळसंद तलाव कोरडा पडल्यामुळे विटा शहरात पाणीटंचाई निर्माण झाली. परंतु, या सर्व अडचणींवर मात करून पाणीपुरवठा लवकरच सुरळीत होणार आहे.
माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत व महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून विजेची अडचण सोडवून घेतली आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांनी जलसिंचन विभागाला आदेश देत आळसंद तलाव भरून घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यामुळे येत्या दोन दिवसात ताकारीचे पाणी आळसंद तलावात येणारच होते.
परंंतु, काही राजकीय मंडळी आळसंद तलावाची पाहणी केल्याचा फार्स करत आहेत. हे नेहमीचेच आहे. परंतु, नागरिकांनी या प्रकाराला जास्त महत्त्व देण्याची गरज नाही, असेही वैभव पाटील म्हणाले.