एडस्चे प्रमाण केवळ अर्धा टक्का
By admin | Published: November 30, 2015 11:15 PM2015-11-30T23:15:14+5:302015-12-01T00:17:10+5:30
जिल्ह्यातील स्थिती : निम्म्याने झाली घट; पॉझिटिव्हीटीमध्ये ‘सी’ ग्रेड ; अनैतिकतेवर केली संस्काराने मात
राजन वर्धन -- सावंतवाडी -देशातील शंभर टक्के साक्षर जिल्हा म्हणून गौरव मिळविलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात एडस्ग्रस्त रूग्णांची संख्या राज्याच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात घटली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा यामध्ये पन्नास टक्क्याहून अधिक घट झाली आहे. आॅक्टोंबर २०१५ पर्यंतच्या तपासणीत हे प्रमाण ०.४५ एवढे असल्याचे आढळले आहे. तसेच ‘पॉझिटिव्हीटी टेस्ट’मध्ये राज्यात सिंधुदुर्ग जिल्हा ‘सी ग्रेड’ (तळाच्या वर्गवारीत) आहे. या शुभसंदेशाचा खरा पाया कोकणची सुसंस्कृती असल्याचा दाखला खुद्द जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन बिलोलीकर यांनी दिला आहे. त्यामुळे आज होणाऱ्या एडस् निर्मूलन दिनाच्या निमित्ताने अनैतिकतेवर सुसंस्कृतीने विजय मिळवित सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वैभवात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
एकेकाळी जगाला हादरवून सोडणाऱ्या भयानक अशा एडस् रोगाने अखंड मानवतेला जीवन-मरणाच्या फेऱ्यात गुरफटले होते. जागतिक पातळीवर एडस्चा पहिला रूग्ण आफ्रिका खंडात आढळला. भारतात एडसचा पहिला रूग्ण १९८६ साली चेन्नई (तामिळनाडू) येथे आढळला. रक्त संक्रमणाच्या परिक्रियेतून हा रूग्ण आढळला. तर महाराष्ट्र राज्यातील पहिला रूग्ण मुंबई येथे आढळला, जो वेश्याव्यवसायाशी निगडीकतेतून संसर्गीत झाला होता. यानंतर या रोगाने आपले भीषण रूप धारण करत तत्कालीन परिस्थितीत अखंड मानवतेलाच आव्हान निर्माण केले. दरम्यान, हा रोग संभोगजन्य असल्यामुळे जागतिक पातळीवर भीतीचे काहूर माजून गेले. त्यामुळे या रोगाला पायबंद घालणे गरजेचे होते. एकोणिसाव्या शतकाच्या समारोपातील शेवटच्या काही वर्षात या रोगाने मोठे थैमान घातले. ठोस उपाययोजना नसल्याने तत्कालीन परिस्थितीत मानवी जीवन महाभयंकर संकटात सापडले. त्यामुळे एडस्च्या चक्रव्युहातून बाहेर पडण्यासाठी जागतिक पातळीवरील आरोग्य संघटनाही हडबडून जागी झाली.
महाराष्ट्रात या मोहिमेची सुरूवात २००२ साली करण्यात आली. औषधोपचाराचा अभाव असल्याने या मोहीमेमध्ये जनप्रबोधनावर मुख्य भर देण्याशिवास पर्याय नव्हता. त्यामुळेच राज्य शासनामार्फत एडस् जनजागृती अभियानांर्तगत पथनाट्ये, नाटिका, डॉक्युमेंट्री फिल्मस्, पोस्टर्स यांच्या माध्यमातून समाजजागृती केली. त्यामुळे समाजातील विवाहबाह्य शारीरिक संबंधापासून फारकत घेण्यासाठी जनजागृती करण्यावर भर देण्यात आला. पण हा रोगच संसर्गजन्य असल्यामुळे व त्यावर कायमस्वरूपी इलाज नसल्याने रूग्णांची संख्या वाढणे साहजीकच होते. त्याला अटकाव जरी घालता येत नसला तरी मर्यादा मात्र घालता येत होती. या अनुषंगानेच जिल्ह्याजिल्ह्यात दरवर्षी सरकारी रूग्णालयांमार्फत एचआयव्ही टेस्ट करण्याची व लागण झालेल्यांना औषधोपचार मोफत पुरविणारी योजना कार्यान्वित करण्यात आली. त्यानुसार आजतागायत ही तपासणी प्रत्येक जिल्ह्यात सुरू आहे.
या तपासणीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या सन २००२ साली पहिल्याच तपासणीत ४३ रूग्ण एडस्ग्रस्त असल्याचे आढळले. एडस्ची लागण म्हणजे तत्कालीन परिस्थितीत ‘मरण’ असा संदेश पसरला होता. या रूग्णांना धीर देऊन त्यांना औषधोपचाराखाली आणलेच; पण त्यांना अनैतिक शारीरिक संबंधापासून परावृत्त करण्यात आले कि जेणेकरून त्यांच्यापासून आणखी हा फैलाव होऊ नये.
२००३ पासून गरोदर मातांची तपासणी करण्यात आली. यामध्ये चार महिला पॉझिटीव्ह आढळल्या. त्यांच्यावर औषधोपचार करून त्यांच्या जन्मणाऱ्या बाळांना या रोगापासून मुक्त करण्यात आले. तर याच वर्षी करण्यात आलेल्या जनरल तपासणीमध्ये ८९ जण पॉझिटीव्ह आढळले. राज्यपातळीवरील हे प्रमाण पाहता ते मध्यम असले तरी गंभीर असे होते. कारण सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटनाचे केंद्र असल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांमार्फत हा आजार पसरणे साहजीकच होते. परिणामी रूग्णांची संख्या वाढण्याचाही धोका संभवत होता. शिवाय गोवा राज्याला लागूनच असल्याने परदेशी, परराज्यातील पर्यटकांची येथे कायमच वर्दळ. त्यामुळे या रोगाचा धोका जिल्ह्याला कायमच टांगत्या तलवारीप्रमाणे संभवत होता. त्याची परिणीती २००७ च्या तपासणीत दिसून आली. यावेळी २०७ रूग्ण पॉझिटीव्ह आढळले, तर २००८ च्या तपासणीत २१६ एवढे विक्रमी रूग्ण पॉझिटीव्ह आढळले. २००९ सालच्या गरोेदर मातांच्या तपासणीत जवळपास २१ एवढ्या मोठ्या प्रमाणात गरोदर माता एचआयव्ही पॉझिटीव्ह आढळल्या होत्या. यामुळे याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता जाणून जिल्हा आरोग्य विभागामार्फत याबाबत ठोस कार्यवाही करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य एडस् नियंत्रण संस्था मुंबई यांच्या सक्रिय पुढाकारातून व जिल्हा एडस् नियंत्रक पथक सिंधुदूर्ग यांच्या मोलाच्या कामगिरीने जनजागृती अभियानांतर्गत विविध कार्यक्रम राबवून त्यावर मर्यादा घालण्यात आल्या. विविध पथनाट्य, महाविद्यालयांमध्ये जागृतीपर व्याख्याने, जनजागृती अभियानांतर्गत राबविण्यात आलेले विविध उपक्रमानंतर हे प्रमाण कमीकमी होत गेले.
२०१४ च्या वार्षिक तपासणीत केवळ ११२ रूग्ण पॉझिटीव्ह आढळले. तर गरोदर मातांच्या तपासणीत केवळ ४ माता पॉझिटीव्ह आढळल्या. चालू वर्षाच्या आॅक्टोबर २०१५ पर्यंत झालेल्या जनरल तपासणीत केवळ ५६ रूग्ण पॉझिटीव्ह आढळले. तर गरोदर मातांच्या तपासणीत केवळ तीन माता पॉझिटीव्ह आढळल्या. गतवर्षीच्या तुलनेत पाहता हे प्रमाण निम्म्याहून अधिक घटले आहे. तर राज्यपातळीवरील टक्केवारीनुसार हे प्रमाण ०.४५ टक्के एवढे खाली आले आहे. त्यामुळे हे घटते प्रमाण जिल्ह्यातील नैतिकतेचा विजय असून त्यामुळे सिंधुदुर्गच्या वैभवात या शुभसंदेशाने आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
नितीन बिलोलीकर : कोकणाबद्दल आत्मीयता
जिल्ह्यातील घटते एडस् रूग्णांचे प्रमाण हे केवळ आणि केवळ जिल्ह्याच्या सुसंस्काराचे यश आहे. आजही जिल्ह्यात सामूहिक कुटुंबसंस्था टिकून आहे. त्यामुळे घराघरात संस्कारांची शिकवण होते. शिवाय येथून कामासाठी मुंबईसह बाहेरगावी जाणारा तरूण आपली संस्कृती सोबत घेऊन जातो आणि तेथे तो त्या संस्कृतीनेच वागणूक ठेवतो. त्यामुळे सिंधुदूर्ग जिल्ह्यातील या नैतिकतेने राज्यात गौरवाचे स्थान मिळविले आहे. त्यामुळे कोकणी माणसाबद्दल राज्यातील जनतेची आत्मियता गडद झाली आहे.
वर्ष जनरल रूग्ण गरोदर माता
२०१० १९० ८
२०११ १६३ ९
२०१२ १४९ ४
२०१३ १३० ९
२०१४ ११२ ४
२०१५ ५६ ३ (२०१५)