चांदोली धरण भरण्यास फक्त अर्ध्या ‘टीएमसी’ची गरज, पावसाने पुन्हा ओढ दिली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 12:17 PM2023-09-15T12:17:39+5:302023-09-15T12:18:56+5:30
चार दिवसांपासून कडक उन्हाचे चटके
विकास शहा
शिराळा : शिराळा तालुक्यात पावसाने पुन्हा ओढ दिली आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंतेत आहे. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे ९८.४९ टक्के (३३.८९ टीएमसी) भरले आहे. हे धरण भरण्यास फक्त अर्धा ‘टीएमसी’ पाण्याची गरज आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाथरपुंज परिसराने ५००० मिलिमीटरचा पावसाचा टप्पा पार केला आहे. या धरणात १५८५ क्यूसेकने पाण्याची आवक सुरू आहे.
दोन दिवस पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर मात्र चार दिवसांपासून कडक उन्हाचे चटके बसत आहेत. यामुळे शेतकरीवर्ग चिंतेत आहे. तालुक्यातील धरणे, तलाव भरले आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मात्र जनावरांच्या चाऱ्याचा तसेच पिकांचा प्रश्न निर्माण होणार आहे. सोयाबीनवरील किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. भात पिके पिवळी पडली आहेत.
चांदोली धरण ३४.४० टीएमसी क्षमतेचे आहे. त्यापैकी ३३.८९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे फक्त ०.५१ टीएमसी पाण्याची धरण भरण्यास आवश्यकता आहे, तर २७ टीएमसी (९८.१२ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाथरपुंज येथे ५०६२ मिलिमीटर, निवळे येथे ३७१७ मिलिमीटर, धनगरवाडा येथे २००६ मिलिमीटर, धरण परिसर १५८५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील नवजा येथे सर्वात जास्त म्हणजे ५४१२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.