वैद्यकीय अधिकाऱ्यांनीच वाचला तक्रारींचा पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:27 AM2021-04-21T04:27:19+5:302021-04-21T04:27:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिकेकडील प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेसा कर्मचारी वर्ग नाही. नोंदणी, लसीकरण, अँटिजेन चाचणीसाठी एकच कर्मचारी ...

Only medical officers read the complaints | वैद्यकीय अधिकाऱ्यांनीच वाचला तक्रारींचा पाढा

वैद्यकीय अधिकाऱ्यांनीच वाचला तक्रारींचा पाढा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : महापालिकेकडील प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेसा कर्मचारी वर्ग नाही. नोंदणी, लसीकरण, अँटिजेन चाचणीसाठी एकच कर्मचारी आहे. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही. परिसरात साप फिरत असतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांची सहनशीलता संपली आहे, अशा तक्रारीचा पाढा मंगळवारी वैद्यकीय अधिकाऱ्यांनीच महापौरासमक्ष वाचला. दोन दिवसात प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आवश्यक स्टाफ, उपकरणे द्यावीत, असे आदेश महापौर सूर्यवंशी यांनी प्रशासनाला दिले.

महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता महापौर सूर्यवंशी यांनी आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, प्रभाग समन्वयक अधिकारी, नगरसेवक यांची एकत्रित बैठक घेतली. यावेळी स्थायी सभापती पांडुरंग कोरे, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, उपायुक्त राहुल रोकडे, स्मृती पाटील, आरोग्याधिकारी डॉ. सुनील आंबोळे, डॉ. रवींद्र ताटे उपस्थित होते.

बैठकीत वैद्यकीय अधिकाऱ्यांना समस्याबाबत डॉ. शीतल धनवडे, डॉ. शबाना लांडगे, डॉ. वर्षा पाटील, डॉ. वैशाली पाटील, डॉ. अंजली धुमाळ, डॉ. अक्षय पाटील यांच्यासह बहुतांशी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तक्रारींचा पाढा वाचला. आरोग्य केंद्रावर पुरेसा स्टाफ नाही. केंद्रावर लसीकरणासाठी नागरिक गर्दी करतात. स्टाफअभावी लसीकरणाला वेळ लागतो. गर्दी वाढते. वादावादी, भांडणाचे प्रकार घडत आहेत. पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली तर ते दुर्लक्ष करतात. त्यामुळे संरक्षणाची सोय करा, स्टाफ द्या अशी मागणी केली.

डॉ. अक्षय पाटील म्हणाले, स्टाफला एक दिवसही सुट्टी मिळत नाही. चार ते पाच तास पीपीई किट घालून थांबावे लागते. त्यामुळे स्टाफची सहनशीलता संपली आहे. डॉ. अंजली धुमाळ म्हणाल्या, आरोग्य केंद्रावर स्टाफ नाही. कार्यक्षेत्रात रुग्ण वाढले आहेत. काही स्टाफही कोरोनाबाधित झाला आहे. पिण्याच्या पाण्याची सोय नाही. नागरिकांना बसण्याची सोय नाही. त्यांना उन्हात उभे राहावे लागते, परिसरात गवत वाढले आहे. त्यामुळे साप फिरत आहेत. डॉ. वर्षा पाटील, डॉ.वैशाली पाटील यांनी टेक्निशियन, स्टाफ, डाटा ऑपरेटर, एएनएम, पीसी, टॅब देण्याची मागणी केली. माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी, अभिजित भोसले, प्रकाश मुळके, जगन्नाथ ठोकळे, ऊर्मिला बेलवलकर, गजानन मगदूम, संतोष पाटील यांनीही आरोग्य विभागाच्या नियोजनाचे वाभाडे काढले.

Web Title: Only medical officers read the complaints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.