‘कृष्णा’मध्ये महाआघाडी होण्यात राष्ट्रवादीचाच अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:26 AM2021-03-05T04:26:18+5:302021-03-05T04:26:18+5:30
अशोक पाटील / लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी सहकार पॅनेलविरोधात रयत आणि संस्थापक पॅनेल ...
अशोक पाटील / लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी सहकार पॅनेलविरोधात रयत आणि संस्थापक पॅनेल एकत्र येणार, अशी चर्चा आहे. मात्र मागील सर्व निवडणुकांत जयंत पाटील यांची भूमिका नेहमीच तटस्थ राहिल्याने वाळवा, कडेगाव तालुक्यांतील राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते सहकार पॅनेलमधून संचालक झाले आहेत. त्यामुळे महाआघाडी करण्यात राष्ट्रवादीच्या संचालकांचाच अडथळा येणार आहे.
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी कारखान्याची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. सहकार पॅनेलचे प्रमुख डॉ. सुरेश भोसले आणि डॉ. अतुल भोसले भाजपचे असले तरी वाळवा तालुक्यातील विद्यमान संचालक लिंबाजी पाटील (तांबवे), संजय पाटील (इस्लामपूर), अमोल गुरव (बहे), जयश्री पाटील (बहे), सुजित मोरे (रेठरे हरणाक्ष), दिलीप पाटील (नेर्ले) हे सर्वजण जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहेत. या पॅनेलमध्ये जितेंद्र पाटील हे कॉँग्रेसचे संचालक आहेत. आगामी निवडणुकीतही हे सर्व संचालक डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलमधूनच निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे यंदाही जयंत पाटील यांची भूमिका तटस्थ राहणार असल्याचे सांगितले जाते. राष्ट्रवादीच्या सर्व विद्यमान संचालकांनी याला दुजोरा दिला आहे.
सध्या सत्ताधारी सहकार पॅनेलविरोधात रयत आणि संस्थापक पॅनेल एकत्र येणार, अशी चर्चा आहे. राष्ट्रवादीतील काही कार्यकर्ते माजी अध्यक्ष तथा संस्थापक पॅनेलचे प्रमुख, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या पाठीशी आहेत, तर रयत पॅनेलचे प्रमुख डॉ. इंद्रजित मोहिते यांचेही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कौतुक केले आहे. त्यामुळे या दोन गटांची महाआघाडी करण्याची तयारी सुरू आहे. असे असले तरी संस्थापक आणि रयत पॅनेल एकत्र येण्यास सहकार पॅनेलमधील २१ पैकी राष्ट्रवादीच्या सहा संचालकांचे आव्हान मोठे आहे. त्यामुळेच महाआघाडी होण्यात राष्ट्रवादीचाच अडथळा येणार आहे.
कोट
वाळवा तालुक्यातून जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्ते सहकार पॅनेलमधूनच इच्छुक आहेत. संस्थापक पॅनेलने कर्जरूपाने भांडवल उभे करून ऊस उत्पादकांना एफआरपी दिली. ते कर्ज फेडण्याची वेळ सहकार पॅनेलवर आली. यातूनही कारखाना व्यवस्थितपणे चालविला गेला. सध्या सहकार पॅनेल सक्षम आहे. त्यामुळे विद्यमान संचालक त्यांच्याकडूनच इच्छुक आहोत.
- संजय पाटील, संचालक, सहकार पॅनेल