लर्निंग लायसन्ससाठी ऑनलाईनचा पर्यायच बरा; मात्र गैरप्रकारांना हवा आळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:18 AM2021-07-02T04:18:18+5:302021-07-02T04:18:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शिकाऊ वाहन परवाना मिळवण्यासाठी लागणाऱ्या लांबच लांब रांगा आणि होणारी गर्दी आता थांबली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शिकाऊ वाहन परवाना मिळवण्यासाठी लागणाऱ्या लांबच लांब रांगा आणि होणारी गर्दी आता थांबली आहे. प्रशासनाने ऑनलाईन पध्दतीने लर्निंग लायसन्स देण्याची प्रक्रिया सुरु केल्याने आरटीओ कार्यालयात होणारी गर्दी कमी झाली आहे. मात्र, तरीही या ऑनलाईन प्रक्रियेच्या माहितीसाठी काही पालक कार्यालयात हजेरी लावत आहेत.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे गेल्या दीड वर्षांपासून शासकीय कामकाजावर निर्बंध लागू झाले आहेत. त्यातही आरटीओसारख्या नेहमीच गर्दी होणाऱ्या कार्यालयात अधिक निर्बंध लागू आहेत. त्यामुळे लर्निंग लायसन्ससाठीची गर्दी लक्षात घेऊन सरकारने काही धोरणात्मक निर्णय घेतले आहेत.
राज्यात २०१७पासूनच ऑनलाईन पध्दतीने परीक्षा घेऊन लायसन्स दिले जात आहे. आता केंद्र सरकारने यात अजून सुलभता आणत लर्निंग लायसन्ससाठी कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. यापूर्वी ऑनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर अपॉईंटमेंट घेऊन कार्यालयात येऊन परीक्षा द्यावी लागत असे. त्यानंतर लायसन्स मिळत असे. आता मात्र अगदी घरात बसूनही ही परीक्षा देता येणार आहे. यासाठी ‘सारथी’च्या प्रणालीमार्फत कामकाज सुरु आहे. पहिले काही दिवसांची तपासणी झाल्यानंतर जिल्ह्यातही ऑनलाईन पध्दतीने लर्निंग लायसन्ससाठी परीक्षा द्यावी लागत आहे.
चौकट
नवीन प्रणालीची माहिती नसल्याने सुरुवातीला काही अडचणी येत होत्या. मात्र, आता सुरु आहे. ऑनलाईन पध्दतीने परीक्षा देणाऱ्यांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक आहे. राज्यातील काही आरटीओ कार्यालयांमध्ये ऑफलाईन लायसन्स मिळवण्यासाठी गर्दी होत असल्याचे चित्र होते. या पार्श्वभूमीवर सांगलीतील कार्यालयातील आढावा घेतला असता, ऑफलाईनपेक्षा ऑनलाईनच अर्ज अधिक येत असून, अनेकांनी ऑनलाईनलाच पसंती दिल्याचे दिसून आले. त्यामुळे कार्यालयातील गर्दीही कमी होती.
चौकट
ऑनलाईनसाठी अडचणी काय?
प्रशासनाने ऑनलाईन लर्निंग लायसन्सची प्रक्रिया सुरु केली असली तरी त्यात अडचणीही आहेत. याबाबत चुकीच्या मार्गाने लायसन्स मिळवू नये, असे आवाहन केले आहे.
* ऑनलाईन पध्दतीमध्ये महा ई-सेवा केंद्र, ड्रायव्हींग स्कूलचालकांकडून काही गैरप्रकार होण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी आरटीओंनी निर्देश दिले आहेत.
* ऑनलाईन पध्दतीत उमेदवारांऐवजी दुसराच व्यक्ती परीक्षा देण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरुन यात बदल करत अधिक चांगल्याप्रकारे नियमांचे पालन केल्यास या प्रक्रियेचा नागरिकांना फायदाच होणार आहे.
चौकट
उमेदवार वेगळा, ऑनलाईन परीक्षा देणारा दुसराच
ऑनलाईन परीक्षेच्याबाबतीत अनेकदा अडचणी येत आहेत. त्यामुळेच राज्य पातळीवरुन याबाबत नवीन निर्देश देण्यात येत आहेत. अनेकदा या परीक्षेची माहिती असणारा व्यक्तीच पुन्हा-पुन्हा परीक्षा देत आहे. त्यामुळे ‘सारथी’चे निर्माण करणाऱ्या यंत्रणेने अधिक काटेकोरपणे याचे नियोजन करण्याची मागणी होत आहे.
कोट
शासनाच्या निर्देशानुसार ऑनलाईन पध्दतीने लर्निंग लायसन्सची प्रक्रिया सुरु आहे. सुरुवातीला काही अडचणी असल्या तरी आता त्याचा चांगला लाभ नागरिकांना मिळत आहे. नागरिकांनी कार्यालयात गर्दी न करता या सेवेचा लाभ घ्यावा.
- विलास कांबळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सांगली