राज्याच्या बजेटमध्ये सांगलीला ठेंगाच!-‘गदिमा’ स्मारकासाठी केवळ तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 01:12 AM2018-03-10T01:12:16+5:302018-03-10T01:12:16+5:30
सांगली : शेटफळे (ता. आटपाडी) येथे साहित्यिक ग. दि. माडगुळकर यांच्या स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यापलिकडे राज्याच्या अर्थसंकल्पात सांगलीला ठेंगाच मिळाला. अपूर्ण सिंचन योजना, शेती, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, क्षारपड जमिनीसह यांच्यासाठी ठोस तरतूद नसल्याचे स्पष्ट झाले.
आशिया खंडातील सर्वांत मोठी उपसा सिंचन योजना म्हणून टेंभू योजनेची ओळख आहे. ताकारी, म्हैसाळ, आरफळ, वाकुर्डे या योजनाही शेतकºयांच्यादृष्टीने महत्त्वाच्या आहेत. या योजना गेल्या वीस वर्षांपासून अपूर्ण आहेत. शेतकºयांच्या दृष्टीने त्यांची शंभर टक्के कामे पूर्ण होण्याची गरज आहे. जिल्ह्यात भाजपाचे चार आमदार आणि एक खासदार असल्यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पातअपूर्ण सिंचन योजनांसाठी विशेष निधी मिळेल, अशी शेतकºयांची अपेक्षा होती; पण याही सरकारने शेतकºयांची निराशाच केल्याच्या जाणकारांच्या प्रतिक्रिया आहेत. शेतीचे उत्पन्न दुप्पट वाढविण्याची अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घोषणा केली आहे; पण त्यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना केलेल्या नसल्याबद्दलही शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली आहे. जिल्ह्यात कोणताही नवीन उद्योग नाही. शासकीय रुग्णालयासाठी निधीची गरज असूनही त्यासाठीही तरतूद नसल्याचे दिसून आले.
थोडी खुशी
स्पर्धा परीक्षा केंद्राच्या निर्णयाचे विद्यार्थ्यांकडून स्वागत
राज्यातील प्रत्येक जिल्हास्तरावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पात केली आहे. या तरतुदीचे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांनी स्वागत करीत या निर्णयाची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
ग्रामीण भागाला चालना देणारा अर्थसंकल्प : संग्रामसिंह देशमुख
गाव आणि खेड्यांच्या विकासासाठी नवनवीन योजनांव्दारे भरीव तरतूद करीत ग्रामीण भागाला चालना देणारा अर्थसंकल्प असल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी सांगितले. शेतकºयांना दिलासा, उद्योजकांना बळ, विद्यार्थ्यांना ताकद देण्याचा प्रयत्न करण्यात आला. जलयुक्त शिवारसाठी पंधराशे कोटीची तरतूद करण्यात आल्याने मागेल त्याला शेततळे मिळेल. शेतकºयांच्या वीजजोडणीचा प्रश्न गंभीर होता, त्यासाठी ७५० कोटी रुपये मिळणार आहेत.
थोडी नाराजी
जिल्ह्यातील शेतकºयांसह सामान्यांची निराशाच : संजय कोले
केंद्र आणि राज्य सरकारच्या अंदाजपत्रकांमध्ये शेतकºयांसाठी फार देत असल्याच्या केवळ गोड गोड घोषणाच केल्या आहेत. शेतीसाठी ठोस काहीच तरतूद केलेली नाही. शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केली आहे; पण उत्पन्न दुप्पट कसे होणार, याबाबतचे काहीच स्पष्टीकरण नसल्यामुळे त्यांच्या घोषणेला काहीच अर्थ नाही, अशी टीका शेतकरी संघटनेचे संजय कोले यांनी केली.
राज्याच्या अर्थसंकल्पात केवळ पोकळ घोषणा : महेश खराडे
जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन योजनांसह शेतकºयांच्या हितासाठी राज्य सरकारकडून ठोस निधीची तरतूद अपेक्षित होती; पण अर्थसंकल्पावर नजर टाकल्यास शेतकºयांची निराशाच झाली आहे. शेतीमाल प्रक्रियेसाठी केवळ ५० कोटी मिळणार आहेत. शेततळी, कृषी उद्योगांसाठीही फारशी तरतूद नसल्यामुळे शेतकरी, सामान्य जनतेच्यादृष्टीने अर्थसंकल्प फेल ठरला आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते महेश खराडे यांनी केली.