राज्यात यापुढे केवळ विकासाचे ‘नरेटिव्ह’ चालेल, पंकजा मुंडे यांनी केला दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 05:16 PM2024-11-15T17:16:15+5:302024-11-15T17:17:07+5:30
महाआघाडीच्या ‘फेक नरेटिव्ह’मुळे राज्याचे नुकसान
मिरज : संविधान धोक्यात असल्याचा खोटा अपप्रचार करणाऱ्या महाविकास आघाडीच्या ‘फेक नेरेटिव्ह’ मुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले. मात्र अशा खोट्या प्रचारापासून आता जनता सावध झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात फक्त विकासाचा नरेटिव्ह चालणार असल्याचा दावा भाजपच्या आमदार पंकजा मुंडे यांनी केला आहे.
बेडग (ता. मिरज) येथे महायुतीचे उमेदवार सुरेश खाडे यांच्यासाठी आमदार पंकजा मुंडे यांची गुरुवारी प्रचार सभा झाली. यावेळी मुंडे म्हणाल्या, गेल्या दहा वर्षापासून पंतप्रधानपदी असलेल्या नरेंद्र मोदी यांनी संविधानाचे संरक्षण केले आहे. त्यामुळे संविधानाला धोका आहे, अशा भूलथापा विरोधकांनी आता बंद कराव्यात. महाविकास आघाडीकडे विकासाचा कोणताही अजेंडा नसल्याने ते खोटे आरोप व अपप्रचार करत आहेत. अशा भूलथापांना आपण बळी पडू नका, मिरजेतील महायुतीचे उमेदवार आमदार सुरेश खाडे यांच्यासह सर्वच महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा.
यावेळी भाजपा नेत्या नीता केळकर, सुमन खाडे, भाजप जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, प्रकाश ढंग, जनसुराज युवाशक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, माजी महापौर संगीता खोत, स्वाती शिंदे, बेडगचे सरपंच उमेश पाटील, शिवसेनेचे किरण राजपूत यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
पंकजा मुंडे यांच्या बॅगेची तपासणी ..
मिरजेचे महायुतीचे उमेदवार सुरेश खाडे यांच्या प्रचारासाठी भाजप आमदार पंकजा मुंडे या बेडग येथील हॅलिपॅडवर उतरल्या. त्यावेळी निवडणूक आयोगाच्या पथकाने त्यांच्या बॅगेची तपासणी केली.