‘पाटलांच्या तुरीचा तोराच न्यारा
By admin | Published: February 10, 2017 12:05 AM2017-02-10T00:05:30+5:302017-02-10T00:05:30+5:30
विक्रमी उत्पादन : सुसलादच्या तब्बल १४ फूट उंच तुरीच्या झाडांची चर्चा
गजानन पाटील ल्ल संख
सर्वसाधारणपणे शेतकरी उसाचा खोडवा घेतात; मात्र तूर पिकाचा सलग चौथा खोडवा घेत एकरी वर्षभरात ४३ क्विंटल उत्पादन तेही ठिबक सिंचनावर घेण्याचा प्रयोग जत तालुक्यातील सुसलाद येथील गौडाप्पा पाटील या प्रगतशील शेतकऱ्याने केला आहे. त्यांच्या शेतातील १४ फूट उंचीचे तुरीचे पीक पाहिल्यानंतर पाटलांच्या तुरीचा न्याराच तोरा पाहायला मिळाला.
लागवडीपूर्वी सरीमध्ये एकरी एक ट्रॅक्टर शेणखत घातले. त्यानंतर २५ किलो १०:२६:२६ खत सरीमध्ये मिसळले. शेणखत व रासायनिक खत सरीत पसरले. ३० दिवसांनी युरिया १० किलो व डीएपी २० किलो टाकले ६० दिवसांनी दुसरे खुरपणी करुन २० किलो युरिया व खत २० किलो सरीमध्ये टाकले. ९० दिवसांनी विद्राव्य खत व टॉनिक याची फवारणी केली. ११० दिवसांनी विद्राव्य खत व टॉनिक याची दुसऱ्यावेळी फवारणी केली. कळी सोडल्यापासून फूल व शेंगा पक्व होईपर्यंत १० दिवसांच्या अंतराने कीटकनाशकाची फवारणी केली. तुरीची सात फुटापर्यंत उंची वाढली. डिसेंबरमध्ये अडीच एकरात ३८ क्विंटल उत्पादन काढले. नंतर तुरीचे पीक न काढता छाटणी करुन घेतली.
शेणखत, ड्रीपद्वारे खताच्या मात्रा दिल्या. त्यामुळे तयार खोडावर खोडवा तूर तीन महिन्यात तयार झाली. मार्चमध्ये पुन्हा २० क्विंटल उत्पादन निघाले. डिसेंबरमध्ये ३८ व मार्चमध्ये १० क्विंटल उत्पादन निघाले. वर्षात ५८ क्विंटल उत्पादन पहिल्यावर्षी मिळाले. त्यानंतर एप्रिल २०१६ मध्ये छाटणी केली. मात्र दुष्काळ असल्याने उत्पादन न घेता पीक जिवंत ठेवण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे जूनमध्ये दुसऱ्या खोडव्याचे घेता आले नाही.
जुलैमध्ये तिसरा खोडवा घेण्याची तयारी केली. शेणखत व ड्रीपद्वारे खताच्या मात्र दिल्या. कोणत्याही कीड रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही. एका झाडाला सरासरी दोन किलो तूर असल्याने ५० क्विंटल उत्पन्न अपेक्षित आहे. या झाडांची तिसऱ्या खोडव्याला उंची १४ फूट वाढली आहे. आतापर्यंत १५ क्विंटल तूर १०० रुपये दराने विकली आहे. वर्षात बियाणे विक्रीतून व तूर विक्रीतून हेक्टरी १० लाख ८० रुपयांचे उत्पन्न त्यांनी घेतले आहे.
द्राक्ष पिकालाही तूर पर्यायी पीक ठरु शकते. मात्र त्यासाठी लागवड तंत्र वापरायला हवे. योग्यप्रकारे काळजी घेतल्यास तुरीचे पाच खोडवे देखील घेता येऊ शकतात. वर्षभरात दोनवेळा उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुधारित तंत्राचा वापर करुन तूर लागवड करावी. - गौडाप्पा पाटील, शेतकरी, सुसलाद